Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य बोर्डाने सुरुवातीला बारावीचा निकाल जाहीर केला. महाराष्ट्र राज्य बोर्डाने 5 मे 2025 रोजी बारावीचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच 13 मे 2025 रोजी राज्य बोर्डाच्या माध्यमातून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे निकाल यंदा वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आले आहेत. दरवर्षी राज्य बोर्डाकडून बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी आणि दहावीचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जात असतो.

यंदा मात्र मे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातच दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर झाले आहेत आणि आता विद्यार्थी पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी लगबग करत आहेत. दरम्यान शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्वाची बातमी समोर येत आहे.
ही बातमी पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की पुणे विभागात एफवायजेसी म्हणजेच अकरावीच्या प्रवेशाबाबतची एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
काय आहेत डिटेल्स
मिळालेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पुणे विभागात प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेग घेत आहे. खरंतर यावर्षी पहिल्यांदाच राज्यभरात सर्वत्र अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली.
आधी राज्यातील फक्त मेट्रो शहरांमध्ये 11 वी ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होती मात्र आता ही प्रवेश प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन करण्यात आली आहे. दरम्यान ऑनलाईन प्रवेशाच्या अनुषंगाने पुणे विभागात आवश्यक ती कारवाई सुरू झाली आहे.
पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील एकूण 1533 महाविद्यालयांपैकी 1526 महाविद्यालयांनी यशस्वी नोंदणी सुद्धा पूर्ण केलेली आहे. महत्वाची बाब अशी की शिक्षण विभागाकडून आणखी पाच ते सहा महाविद्यालयांची यामध्ये भर पडण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.
म्हणजेच विद्यार्थ्यांना या कॉलेजेस मधून आपले मनपसंत कॉलेज निवडता येणार आहे. विद्यार्थ्यांना यावेळी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एकूण दहा कॉलेज पसंती क्रमानुसार निवडता येणार आहेत.
या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध राहतील आणि त्यांना प्रवेशासाठी कोणतीच अडचण येणार नाही, असा आशावाद जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
अडचण भासल्यास या नंबरवर संपर्क साधा
ज्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासंदर्भात काही अडचण असेल त्यांच्या मदतीसाठी शिक्षण विभागाकडून 8530955564 हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. तसेच [email protected] हा ईमेल सुद्धा जारी करण्यात आला आहे.
आतापर्यंत पुणे विभागातील 1526 महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. याच्या जिल्हानिहाय आकडेवारीबाबत बोलायचं झालं तर पुण्यातील 685, अहिल्यानगर मधील 453 आणि सोलापूर जिल्ह्यातील 377 महाविद्यालयांची आतापर्यंत नोंदणी पूर्ण झाली आहे.
अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ही 19 मे 2025 पासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज करता येईल अशी माहिती देण्यात आली आहे.