Metro News : मुंबई आणि ठाणेकरांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मुंबई मेट्रो मार्ग 4A (कासारवडवली-गायमुख) चे संपूर्ण बांधकाम पूर्ण केले आहे.
हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या काही आठवड्यांत तांत्रिक तपासणी, सुरक्षा चाचण्या आणि सेफ्टी सर्टिफिकेशनची प्रक्रिया सुरू होणार आहे.

मेट्रो मार्ग 4A हा वडाळा ते कासारवडवली या मेट्रो मार्ग 4 चा महत्त्वाचा विस्तार असून, तो ठाण्यातील गायमुखला थेट मेट्रो नेटवर्कशी जोडणार आहे. सध्या गायमुख ते कॅडबरी जंक्शन या परिसरात पीक अवर्समध्ये प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
मात्र, मेट्रो 4A सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवासाचा वेळ किमान 15 ते 20 मिनिटांनी कमी होणार असून, घोडबंदर रोडवरील ताण लक्षणीयरीत्या घटण्याची अपेक्षा आहे.
एमएमआरडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो मार्गावरील सर्व स्ट्रक्चरल कामे पूर्ण झाली आहेत. स्थानकांवरील एस्केलेटर, लिफ्ट, तिकीट प्रणाली, विद्युत व्यवस्था आणि सिग्नलिंग यंत्रणांची बसवणी अंतिम टप्प्यात आहे. बहुतांश स्थानकांवर फिनिशिंगचे कामही पूर्ण झाले आहे.
तांत्रिक तपासणीसाठी ‘रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन’ (RDSO) कडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, हिरवा कंदील मिळाल्यानंतर प्रत्यक्ष ट्रायल रन सुरू होईल.
ही मेट्रो लाईन सुरू झाल्यानंतर मुंबई–ठाणे दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे इस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि घोडबंदर रोडवरील गर्दी कमी होईल,
तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषणही घटेल. सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळून शाश्वत शहरी विकासाला बळ मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कासारवडवली ते गायमुख असा 2.7 किलोमीटर लांबीचा उन्नत मेट्रो मार्ग असलेल्या मेट्रो 4A मध्ये दोन स्थानके आहेत.
सर्व तांत्रिक व सुरक्षा मंजुरीनंतर येत्या काही महिन्यांत ठाण्यातील पहिली मेट्रो सेवा सर्वसामान्यांसाठी खुली होण्याची दाट शक्यता आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास जाणे म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण व्यवस्थेसाठी एक मोठे यश मानले जात आहे.













