आमदार साहेबांचा नादखुळा ! अर्धा एकर शेतीवर स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी, 400 रुपये किलोचा मिळतोय दर

Ajay Patil
Published:

MLA Santosh Danve Strawberry Farming : स्ट्रॉबेरी म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभे राहत ते थंडगार हवामानाचा प्रदेश असलेलं महाबळेश्वर. मात्र आता स्ट्रॉबेरी ची शेती मराठवाड्यासारख्या उष्ण हवामानात देखील शक्य झाले आहे. विशेष म्हणजे येथील शेतकरी आता स्ट्रॉबेरीच्या पिकातून लाखोंची कमाई करू लागले आहेत.

दरम्यान आता जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदार संघाच्या आमदारांनी देखील स्ट्रॉबेरी शेतीचा हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. यामुळे सध्या भोकरदन मतदार संघाचे आमदार संतोष दानवे यांची परिसरात चर्चा रंगली आहे. विशेष बाब अशी की आमदार दानवे यांनी मराठवाड्यातील इतर शेतकऱ्यांना उष्ण हवामानातही योग्य पद्धतीने नियोजन आखलं तर स्ट्रॉबेरीची शेती केली जाऊ शकते हे दाखवून दिले आहे.

भोकरदन तालुक्यातील मौजे सावंगी अवघडराव येथील प्रगतशील शेतकरी हरिभाऊ भुते यांचा स्ट्रॉबेरी चा मळा पाहून दानवे यांनी स्ट्रॉबेरी शेती करण्याचा निश्चय केला. या अनुषंगाने आमदार महोदय यांनी आपल्या भोकरदन शहरा लागत असलेल्या अडीच एकर क्षेत्रापैकी अर्ध्या एकर क्षेत्रावर शेडनेटची उभारणी केली.

मग ऑक्टोबर महिन्यात स्ट्रॉबेरीच्या विंटर डाऊन या जातीची आठ हजार रोपे मागवली गेली. नऊ रुपये प्रतिरोप या पद्धतीने रोपांची खरेदी झाली. यासाठी त्यांना 75 हजाराचा खर्च आला. स्ट्रॉबेरीची लागवड करतांना हरिभाऊ यांच मार्गदर्शन घेतलं. पीक लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत करण्यात आली आणि शेणखताचा वापर झाला.

जमीन मशागतीनंतर बेड तयार करण्यात आले आणि बेडवर मल्चिंग पेपर अंथरून रोपांची लागवड झाली. मग पिकाची योग्य पद्धतीने जोपासना करण्यात आली. खरं पाहता लागवडीनंतर उत्पादन मिळणार कां याबाबत थोडीशी भीती होती. मात्र महिन्याभरानंतर प्रत्यक्ष उत्पादन हाती आल्यानंतर भोकरदन सारखे उष्ण हवामानात देखील स्ट्रॉबेरीची ही नवीन विविधता यशस्वीरित्या उत्पादित होते हे त्यांच्या लक्षात आले.

दरम्यान आत्तापर्यंत त्यांनी अर्धा एकर स्ट्रॉबेरी पिकातून 1 क्विंटल पर्यंतचे उत्पादन घेतले असून आत्तापर्यंत दोन वेळा हार्वेस्टिंग करण्यात आली आहे. अजून स्ट्रॉबेरी हार्वेस्टिंग सुरू असून आगामी काही दिवसात एक क्विंटल पर्यंतचे उत्पादन त्यांना मिळणार आहे.

विशेष म्हणजे आमदार महोदय यांच्या शेतातून उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीला चारशे रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे. यामुळे दर्जेदार उत्पादन आणि अधिक दर मिळत असल्याने स्ट्रॉबेरीची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe