पर्यटकांसाठी आनंदवार्ता ! देवदर्शन आता स्वस्तात, खर्चात मोठी बचत; एसटी महामंडळाची नवी योजना

Published on -

MSRTC News : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष कार्यालयातील बाळासाहेब भवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला दिवसभर नेते आणि शिवसैनिकांनी अभिवादन केले.

दरम्यान, दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १००व्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात येणारी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटीसंगे तीर्थाटन’ योजना ही श्रद्धा, सुविधा आणि सामाजिक न्याय यांचा सुरेख संगम असल्याचे प्रतिपादन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी केले.

त्यांनी सांगितले की, ही योजना ‘स्वस्त आणि सुरक्षित’ या ब्रीदवाक्यावर आधारित असून, सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात धार्मिक व पर्यटन प्रवासाची संधी उपलब्ध करून देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे.

२३ जानेवारीपासून ही योजना राज्यातील २५१ एसटी आगारांमधून एकाच वेळी राबविण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येक आगारातून किमान पाच बस या योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने, एका दिवसात राज्यभरातून सुमारे १,००० ते १,२५० विशेष धार्मिक व पर्यटन बसगाड्या धावणार आहेत. त्यामुळे राज्यातील धार्मिक पर्यटनाला मोठे बळ मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत अष्टविनायक दर्शन, ११ मारुती दर्शन, पंढरपूर-अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर-पन्हाळा-जोतिबा, गणपतीपुळे, शेगाव, शिर्डी अशा विविध श्रद्धास्थळांच्या सहली आयोजित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, ही योजना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वसामान्य जनतेवरील प्रेमाची आणि त्यांच्या विचारांची पुढची पायरी आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या १००व्या जयंतीनिमित्त सुरू होणारी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटीसंगे तीर्थाटन’ योजना राज्यातील लाखो भाविकांसाठी श्रद्धेचा, सुरक्षिततेचा आणि समाधानाचा प्रवास ठरणार असून, सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श उपक्रम म्हणून ओळखली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News