Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट पैकी एक आहे. हा पीएम मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. चालू वर्षात एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुकीचीं रणधुमाळी सुरू होणार असल्याने तसेच पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम लक्षात घेता केंद्र शासनाच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान आता या बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या भूसंपादनाबाबत एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरं पाहता हा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांसाठी अति महत्त्वाचा प्रोजेक्ट असून यामुळे या दोन्ही राज्याचा एकात्मिक विकास साध्य होणार असल्याचा दावा केला जातो. सध्यास्थितीला या बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी जमीन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून पालघर मध्ये देखील या प्रोजेक्टसाठी आवश्यक जागेचे संपादन केले जात आहे.
अशातच मात्र पालघर जिल्ह्यातून प्रोजेक्टसाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत मोठा दुजाभाव देखील पहावयास मिळाला आहे. या प्रकल्पासाठी जाणाऱ्या जमिनीसाठी दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात मोठी तफावत असल्याने संबंधित बाधित जमीनदारांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या प्रोजेक्टसाठी जिल्ह्यातील जमीन संपादनाचे काम 99 टक्के पूर्ण झाले आहे. यामुळे आता लवकरच प्रत्यक्ष कामाच्या निविदा देखील जाहीर होणार आहेत. आपल्या राज्यातील मुंबई ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यातून हा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट प्रस्तावित आहे.
या तीन जिल्ह्यात एकूण 155 किलोमीटरचा हा बुलेट ट्रेन मार्ग राहणार आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील 73 गावात 279 हेक्टर एवढी जमीन संपादित केली गेली आहे. दरम्यान बेटेगाव गावातील या प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या जमीनदारांनी मोबदला देताना दुजाभाव केला असल्याचा आरोप लगावला आहे. जमिनीचे मूल्यांकन करताना पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला असून शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात रोष पाहिला मिळत आहे.
या गावातील शेतकऱ्यांच्या मते बेटेगाव आजूबाजूचा परिसर वेगाने विकसित झाला आहे मात्र असे असताना या प्रकल्पासाठी बाधित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात हेक्टरी 72 लाखाची नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जवळच असलेल्या कल्लोळे मान या तुलनेने कमी विकसित असलेल्या गावातील बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी अडीच कोटींची नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात आली आहे.
यामुळे या गावातील शेतकऱ्यांकडून हा आमच्यावर अन्याय असून प्रकल्प प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे मोबदला वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. निश्चितच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आधीच उशीर झाला असताना आता भूसंपादनाबाबत या बेटेगाव गावातील शेतकऱ्यांनी दुजाभावाचा आरोप लगावला असल्याने आता हे प्रकरण काय वळण घेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.