Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग हा मुंबई ते कोकण आणि गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि प्रवाशांसाठी अति महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा असा विषय आहे. याचा विकास झाला तर कोकणातील चाकरमान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर गणेशोत्सवात जी काही मोठी गर्दी या महामार्गावर होते ती टळेल आणि महामार्गावरील अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.
अशातच मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी, राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग आणि राजधानी मुंबई ते सांस्कृतिक राजधानी पुणे यादरम्यान उभारण्यात आलेल्या द्रुतगती महामार्गाच्या धर्तीवर मुंबई गोवा असा नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग उभारला जाईल अशी घोषणा केली.

काही दिवसांपूर्वी ते एका ‘मालवणी महोत्सवा’च्या समारोप समारंभाला उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले की, मुंबई आणि गोवा दरम्यानचा द्रुतगती मार्ग हा ग्रीनफिल्ड (नवीन बांधकाम) असेल आणि त्यावर नियंत्रित प्रवेश राहणार आहे.
एवढेच नाही तर राज्यातील कोकण विभागातील सिंधुदुर्गकडे जाणार्या कोस्टल रोडचेही रुंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यावेळी मुख्यमंत्री महोदय यांनी दिली आहे. यामुळे आता हे नवीन बांधकाम कसे राहतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.