Mumbai Local : मुंबई लोकलने रोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवर १ फेब्रुवारीपासून १२ डब्यांच्या चार नव्या नॉन-एसी लोकल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेतील गर्दी काही प्रमाणात कमी होणार असून दैनंदिन प्रवास अधिक आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.
प्रवाशांची वाढती संख्या आणि मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या चार नव्या लोकलमुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल सेवांची संख्या १,४०६ वरून १,४१० इतकी झाली आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली–बोरिवली सहावी रेल्वेलाईन पूर्ण झाल्यामुळे या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करणे शक्य झाले आहे.
या नव्या सेवांपैकी दोन लोकल अप-मार्गावर आणि दोन लोकल डाऊन-मार्गावर धावणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व लोकल स्लो मार्गावर चालणार असल्याने दहिसर, बोरिवली, कांदिवली, मलाड, गोरेगाव, वांद्रे आदी स्थानकांवरील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
अप-मार्गावर भाईंदरहून सकाळी ११.३९ वाजता वांद्रेकडे जाणारी एक लोकल, तर १२.१४ वाजता चर्चगेटकडे जाणारी दुसरी लोकल धावणार आहे. डाऊन-मार्गावर वांद्रेहून भाईंदरकडे दुपारी १.२१ वाजता आणि संध्याकाळी ४.३० वाजता अशा दोन अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून, विशेषतः डिसेंबर २०२५ पासून, पश्चिम रेल्वेवर विविध तांत्रिक कामांमुळे ब्लॉक घेण्यात आले होते. या ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. अनेक वेळा लोकल उशिरा धावणे, गर्दी वाढणे आणि प्रवासाचा वेळ वाढणे अशा समस्या निर्माण झाल्या होत्या.
मात्र आता चार नव्या लोकल सेवांमुळे ही गैरसोय काही प्रमाणात कमी होणार आहे. गर्दीच्या वेळेत अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी होईल, अशी अपेक्षा पश्चिम रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे. मुंबईकरांसाठी ही बातमी नक्कीच दिलासादायक ठरणारी आहे.













