नागपूर रत्नागिरी नॅशनल हायवे : महामार्गासाठी देवस्थानच्या इनामी जमिनी संपादित, वहीवाटदार शेतकरी मावेजासाठी आंदोलनावर ; कोणाला मिळणार मोबदला?

Published on -

Nagpur Ratnagiri National Highway : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रस्ते विकासाचे कामे मोठ्या जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातूनही राज्यातील वेगवेगळ्या भागातील रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. दरम्यान राज्यात नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे देखील काम जोमात सुरू आहे. विशेष म्हणजे या महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चार तालुक्यातील जमिनी संपादित झाल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील देवस्थानच्या इनामी जमिनी देखील संपादित झाल्या आहेत.

आता या जमिनीचा मोबदलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बाधित झालेल्या देवस्थानच्या इनामी जमिनीला देखील शासनाच्या परिपत्रकानुसार दर दिला जावा. तसेच यातील 50% एवढी रक्कम जमीन कसत असलेल्या वहिवाटदार शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. खरं पाहता मोबदल्यासाठी यापूर्वीच संबंधिताकडे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. मात्र यावर कोणताच निर्णय अद्याप झालेला नाही.

खरं पाहता देवस्थानाच्या इनामी जमिनी 1947 पूर्वीपासून शेतकऱ्यांकडून कसल्या जात आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची त्या संबंधित सातबारावर कब्जेदार व इतर हक्कात नावे देखील समाविष्ट झाले आहेत. विशेष म्हणजे महामार्गासाठी या देवस्थानच्या इनामी जमिनी संपादित करताना या शेतकऱ्यांचीच नावे त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली होती.

अशा परिस्थितीत जमिनीचा मोबदला हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी किसान सभेकडून केली जात आहे. दरम्यान या मागणीसाठी किसान सभे कडून 24 जानेवारीला जिल्हाधिकार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू होणार आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर आणि हातकणंगले अशा चार तालुक्यातील बाधित गावातील जमिनीचे संपादन केलं जाणार आहे. सध्या महामार्गासाठी आंबा ते चोकाकपर्यंत जमीन संपादनाचे कामकाज सुरु आहे. विशेष म्हणजे यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारी मधील 325 गुंठे जमीन देखील संपादित होणार आहे.

अशा परिस्थितीत देवस्थान समितीकडून भूसंपादन विभागाला पत्र पाठवून मोबदल्याची मागणी करण्यात आली आहे. या बदल्यात जवळपास 15 कोटी 79 लाख रुपयांचा मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता या मोबदल्याची रक्कम वहीवाटदार शेतकऱ्यांना मिळते की देवस्थान समितीला मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

खरं पाहता जमिनी देवस्थान समितीच्या असल्या तरी देखील त्या वहिवाटदार शेतकऱ्यांकडे आहेत. शिवाय देवस्थानाला कुळ कायदा लागू होत नाही. परिस्थितीत मोबदल्याचा हा तिढा केव्हा सुटेल अन कसा सुटेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!