Namami Indrayani Project : पुणे जिल्ह्याला मोठं धार्मिक आणि ऐतिहासिक असं महत्त्व प्राप्त आहे. जिल्ह्यातील इंद्रायणीच्या डोहात तुकोबाचे अभंग दरवळले आहेत. इंद्रायणीच्या काठी वसलेल्या देहू गावी संत तुकारामांचा जन्म झाला तर याच इंद्रायणीच्या तीरी म्हणजे देवाची आळंदि या देवभूमीवर संत ज्ञानोबाची समाधी पण आहे.
असं वैभव लाभलेल्या, संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या इंद्रायणीच्या अमृतरुपी पाण्याला मात्र प्रदूषणाने ग्रासले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे नदी प्रदूषण वाढले आहे. यामुळे, ऑक्टोबर महिन्यात आळंदि दौऱ्यावर असताना वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. इंद्रायणीच्या प्रदूषणाचा मुद्दा त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात मांडण्यात आला अन नदी पुनरुज्जीवन करावे अशी मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी अनुदान आणि नियोजन करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. आता, वारकऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक असा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारच्या उच्च अधिकार समितीने इंद्रायणी सुधारासाठी नमामि इंद्रायणी हेतू 995 कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्याला मंजुरी दिली आहे.
खरं पाहता, आळंदी दौऱ्यानंतर नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांची बैठक झाली होती. शेवटी उच्च अधिकार समितीच्या बैठकीत याबाबत सखोल चर्चा झाल्यानंतर या नदीसुधार प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. इंद्रायणी नदी 20.60 किलोमीटर एवढी लांबीची. यापैकी आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत 1.80 किलोमीटर एवढी लांबीची नदी वाहते.
नदीचा दुसरा काठ पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत येतो. यामुळे इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प संयुक्तपणे राबवण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकाने प्रस्ताव तयार केला आहे.
केंद्र आणि राज्य सरकार पुरवणार निधी
खरं पाहता इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि आळंदी भागात येणारा खर्च केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे. यासाठी शासकीय अमृत-२ योजनेंतर्गत लाभ घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पीएमआरडीच्या माध्यमातून काठावरील कामे तसेच चाकण औद्योगिक क्षेत्राकडून येणाऱ्या नाल्यामधील सांडपाणी गोळा करणे व प्रक्रिया करण्याचे काम एमआयडीसी व पीएमआरडीच्या संयुक्त विद्यमाने करता येणे शक्य आहे.
तसेच आळंदी नगरपंचायत क्षेत्रातील कामे अमृत २.० तसेच तीर्थक्षेत्र विकास निधीमधून पूर्ण करण्याचा प्रशासनाने ठरवले आहे. आता या कामासाठी केंद्र सरकारकडून २५ टक्के आणि राज्य सरकारकडून २५ टक्के निधी उपलब्ध होणार आहे, याशिवाय महापालिकेचा स्वनिधी देखील या कामी उपयोगात आणला जाणार आहे, यातून नमामि इंद्रायणीसाठी ५२६ कोटी रुपये, पीएमआरडीच्या माध्यमातून ३९५ कोटी रुपये आणि आळंदी नगरपंचायतीच्या पुढाकाराने ७४ कोटी रुपये असा सुमारे ९९५ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार झाला आहे.
याबाबत सविस्तर अशी माहिती पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी लोकमतला दिली आहे.नमामी इंद्रायणी हा प्रकल्प नमामि गंगेच्या धरतीवर पूर्ण केला जाणार असून यासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिका कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, आळंदी नगर परिषद, देहू नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. निश्चितच यामुळे वारकरी संप्रदायात आनंदाची लाट पाहायला मिळत आहे. निश्चितचं संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावनपुनीत झालेली इंद्रायणी, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासाची साक्षीदार इंद्रायणी पुन्हा एकदा प्रदूषण विरहित होईल यात तीळमात्र देखील शंका नाही.