Newasa Vidhansabha Nikal : नेवासा विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली. तिरंगी लढतीमुळे हा विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिला. येथून नेमके कोण बाजी मारणार गडाख आपली जागा शाबूत ठेवण्यात यशस्वी होणार का असे अनेक प्रश्न होते. अखेरकार काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून यात गडाख यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.
या मतदारसंघात महाविकास आघाडी ठाकरे गटाचे शंकरराव गडाख, प्रहार कडून बाळासाहेब मुरकुटे आणि महायुतीकडून विठ्ठलराव वकीलराव लंघे पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. पण, या तिरंगी लढतीत लंघे पाटील हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिलेत.
त्यांनी या निवडणुकीत आजी-माजी आमदारांना पराभवाची धूळ चारली. तिरंगी लढते मुळे या ठिकाणाची निवडणूक खूपच चुरशीची बनली होती. मात्र या चूरशीच्या लढतीत एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या विठ्ठलराव लंघे पाटील यांनी बाजी मारली असून त्यांनी चार हजार 21 मतांनी विजय मिळवला.
या मतदारसंघात एकूण बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र प्रमुख लढत ही गडाख, लंघे पाटील आणि बाळासाहेब मुरकुटे यांच्यातच झाली. या लढतीत लंघे पाटील यांनी बाजी मारली असून आज आपण त्यांच्या विजयाची कारणे? ते कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढलेत? याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
लंघे पाटील यांच्या विजयाची कारणे
ही निवडणूक तालुक्यातील दहशतवाद, ऊस दराचा प्रश्न, लाडकी बहीण योजना या प्रमुख मुद्द्यांवर लढवण्यात आली. या मुद्द्यांवर लंघे पाटील यांनी निवडणूक लढवल्याने याचा त्यांना फायदा झाला.
लंघे पाटील यांना मतदार संघात मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली. ही माझी शेवटची निवडणूक आहे असे भावनिक साद त्यांनी मतदारांना घातली आणि याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला.
लंघे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचार सभा घेतली होती आणि याचा सुद्धा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला.
याशिवाय राष्ट्रवादीचा एबी फॉर्म असतानाही अब्दुल शेख यांनी माघार घेत लंघे यांना साथ दिली. घोडेगाव परिसरात गडाख यांना रोखण्यासाठी भाजपचे नेवासा विधानसभा प्रमुख सचिन देसरडा यांनी योगदान देत विजयात वाटा उचलला. त्याचप्रमाणे उद्योजक प्रभाकर शिंदे यांनी ऐनवेळी सर्व प्रचार यंत्रणा हातात घेऊन लंघे यांच्या विजयाचे सारथी ठरले. भाजप जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, शिवसेनेचे भाऊसाहेब वाघ, किसनराव गडाख, भाजपचे ऋषिकेश शेटे, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश डिके, बाळासाहेब पवार, राजेंद्र मते यांच्यासह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाइंचे कार्यकर्ते सक्रिय होते. याच कारणामुळे लंघे पाटील विजयी झालेत.