रेल्वेच्या जनरल डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार 20 रुपयांमध्ये जेवण! काय आहे रेल्वेची जन आहार योजना? कोणत्या स्टेशनवर उपलब्ध आहे सुविधा?

Ajay Patil
Published:

भारतीय रेल्वे हे प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून एका दिवसात संपूर्ण देशात लाखोच्या संख्येने प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. सध्या तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा कालावधी सुरू होत असल्यामुळे आता देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ झालेली आहे व मोठी गर्दी होताना दिसून येत आहे.

अशा गर्दीच्या कालावधीमध्ये कन्फर्म तिकीट किंवा आरक्षण प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असतात व कित्येक प्रवाशांना जनरल डब्यातून लांबचा प्रवास करावा लागत आहे. या डब्यामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी असते व लांबचा प्रवास करत असताना पाणी आणि जेवणाच्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

परंतु आता रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टिकोनातून जन आहार योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून जेवण आणि पाणी दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत आता वीस आणि पन्नास रुपयात जेवण व तीन रुपयांमध्ये पाण्याचा ग्लास दिला जाणार आहे.

सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या काही महत्त्वाच्या स्टेशनवर आणि प्रमुख टर्मिनस वर जन आहार योजनेअंतर्गत भोजनाचे काऊंटर सुरू केले आहे. त्यामुळे आता खाजगी विक्रेत्यांकडून मोठ्या किंमतीमध्ये निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ घेण्यापेक्षा रेल्वेने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत जेवणाचा लाभ प्रवाशांना फायद्याचा ठरणार आहे.

 जना आहार योजनेअंतर्गत रेल्वेच्या जेवणामध्ये काय मिळणार?

यामध्ये इकॉनॉमिक जेवण 20 रुपये तर फराळाच्या जेवणाकरिता 50 रुपये दर आकारण्यात येत असून रेल्वे स्टेशनवर फलाटावर ज्या ठिकाणी जनरल डब्बा उभा राहतो त्या ठिकाणी जेवणाचे हे काउंटर सुरू करण्यात आलेले आहेत. जवळपास दीडशे स्टेशनवर ही सुविधा देण्यात आलेली आहे.

जन आहार योजनेअंतर्गत वीस रुपयांमध्ये सात पुरी, 150 ग्रॅम बटाट्याची सुकी भाजी आणि 12 ग्राम लोणचे मिळणार आहे. तसेच पन्नास रुपयांमध्ये राजमा छोले चावल/खिचडी/ कुलचे-भटूरे छोले/ पावभाजी / मसाला डोसा इत्यादी मिळणार आहे व तीन रुपयांमध्ये 200 मिली म्हणजेच एक ग्लास पाणी मिळणार आहे.

 या स्टेशनवर उभारण्यात आले आहेत स्टॉल

1- मध्य रेल्वेच्या माध्यमातून इगतपुरी, कर्जत, मनमाड, खांडवा, बडनेरा, शेगाव, पुणे, मिरज, दौंड, शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी आणि कुर्डूवाडी या स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध आहे.

2- पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, भरूच, वडोदरा आणि चित्तोडगड या स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe