Old Pension Scheme : गेल्या काही वर्षांपासून राज्य कर्मचाऱ्यांकडून नवीन पेन्शन योजना रद्दबातल करत सरसकट कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ दिला पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या काळात या मागणीने सर्वाधिक जोर पकडला. राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात यावर नागपूर येथील विधानभवनात चर्चा होईल अशी आशा होती.
पण, राज्य शासनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील विधानभवनात हिवाळी अधिवेशनादरम्यान जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही असलं मत व्यक्त केलं. यानंतर मात्र एक महिन्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुर बदलले. विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ओ पी एस योजना लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले.
परंतु विधान परिषद निवडणुकीत पाच पैकी भाजपाला केवळ एकच जागेवर विजयश्री मिळवता आला. तज्ञ लोकांनी जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यामुळे भाजपाला धक्का बसल्याचे सांगितले. दरम्यान आता जुनी पेन्शन योजनेची मागणी तीव्र झाली असून 14 मार्चपासून राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातूनही जुनी पेन्शन योजनेची मागणी तीव्र झाली आहे. नगर जिल्हा परिषदेच्या 6000 कर्मचाऱ्यांनी शासनाने यावर लवकरच तोडगा काढला नाही तर 14 मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवू असा इशारा दिला आहे.
एकंदरीत 14 मार्चपासून सुरू होणाऱ्या बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये शिक्षक, शिक्षकेतर संघटना, जिल्हा परिषद, महसूल, ग्रामसेवक, कृषी संघटना एकवटताना दिसत आहेत. यामुळे शासनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शासनाने तोडगा न काढल्यास हे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना बहाल करण्यात आली आहे.
मात्र नवीन पेन्शन योजनेत बहुसंख्य दोष आढळत असल्याने या योजनेचा विरोध होत असून पुन्हा एकदा ओपीएस म्हणजेच जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना बहाल केली जावी अशी मागणी राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वारंवार उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच नाही तर देशातील इतरही राज्यात जुनी पेन्शन योजना मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजस्थान झारखंड हिमाचल प्रदेश पंजाब यांसारख्या राज्यात जुनी पेन्शन योजना तेथील राज्य सरकारने लागू केले आहे.
यामुळे महाराष्ट्रात देखील ही योजना लागू झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी 14 मार्चपासून राज्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा यावेळी दिला असून आता नगर जिल्ह्यातील कर्मचारी या आंदोलनात सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच शासनाचा यावर काय तोडगा काढत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.