Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आता ‘या’ आमदारांनी ठोकला शड्डू; ‘या’ दिवशी काढणार विराट मोर्चा

Ajay Patil
Published:
State Employee News

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना हा मुद्दा शासकीय कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस लागू न करता एनपीएस अर्थातच नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून शासन दरबारी दबाव बनवला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर पंजाब, राजस्थान, झारखंड, हिमाचल प्रदेश या राज्यातील राज्य सरकारांनी आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा बहाल केली आहे. यामुळे आता महाराष्ट्रात देखील पुन्हा ही योजना लागू केली पाहिजे ही मागणी जोर धरू लागली आहे.

यासाठी राज्य कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येत 14 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. अशातच आता आमदार सतेज पाटील यांनी देखील जुनी पेन्शन योजनेसाठी शासनाविरुद्ध बंड पुकारल आहे. त्यांनी चार मार्च रोजी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरात अजिंक्यतारा संपर्क कार्यालय या ठिकाणी राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीचा जुनी पेन्शन योजनेबाबत कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेणे हा महत्त्वाचा उद्देश होता. या बैठकीनंतर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली 04 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर या ठिकाणी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय सर्व शिक्षक संघटना आणि राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनांनी घेतला आहे. यावेळी आमदार पाटील यांनी देशातील पाच राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे मात्र महाराष्ट्रात ही योजना लागू नाही यामुळे महाराष्ट्रात देखील ही योजना लागू झाली पाहिजे अशी आग्रही मागणी बोलून दाखवली आहे.

तसेच, 70 वर्ष देशाने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या जोरावरच प्रगती साधली आहे यामुळे कर्मचाऱ्यांसाठी आता लढा उभारण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच पाटील यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनात महाविकास आघाडी कडून लक्षवेधी मांडली जाईल असं देखील नमूद केल आहे.

यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची जबाबदारी माझ्याकडे असल्याचेही सांगितले आहे. एकंदरीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा गाजणार असून आमदार सतेज पाटील यांनी चार तारखेला भव्य विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला असल्याने आता जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा येत्या महिन्यात अधिकच वादंग उठवणार असल्याचे चित्र आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe