Old Pension Scheme : गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली जात आहे. देशभरात नवीन पेन्शन योजनेविरोधात कर्मचाऱ्यांचा रोष वाढत असून जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्रात देखील यासाठी राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली जात आहे.
या आपल्या मागणीसाठी राज्य कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर देखील जाणार आहेत. अशातच आज देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ओ पी एस योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. फडणवीस यांनी आज सांगितले की, ओपीएस योजनेसाठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. ही योजना आता जर लागू केली तर 2030 नंतर राज्यावर आर्थिक बोजा वाढणार आहे.
अशा परिस्थितीत ज्या राज्यांनी ओ पी एस योजना लागू केली आहे अशा राज्यांचा अभ्यास केला जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढला जाऊ शकतो यामुळे संप नको असे आवाहन देखील कर्मचाऱ्यांना केले आहे. याशिवाय फडणवीस यांनी ओ पी एस योजना आता लागू करायला काहीच हरकत नाही मात्र घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही.
कोणतीही लोकप्रिय योजना लागू करण्यापूर्वी भविष्याचा विचार होणे गरजेचे आहे. तसेच कर्मचाऱ्यांची भूमिका समजून घेण्याची शासनाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेबाबत शासन नकारात्मक नसून प्रत्येकाचे कल्याण शासनाला सुनिश्चित करायचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देताना फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकार केवळ योजनांना पैसे देते सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नाही.
यामुळे ज्या राज्यात ओपीएस लागू झाली आहे त्यांचा अभ्यास सध्या सुरू आहे अस आज फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशभरात जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणून कर्मचारी आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंजाब झारखंड राजस्थान हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात देखील ही योजना लागू व्हावी अशी मागणी कर्मचारी करत आहेत. आपल्या याच मागणीसाठी राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचारी 14 मार्चपासून संपावर जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कर्मचाऱ्यांना संप नको असे आवाहन यावेळी केले आहे.