Paddy Farming : धान हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उत्पादित होणार एक मुख्य पिक आहे. या पिकाची आपल्या राज्यात खरीप हंगामात प्रामुख्याने शेती केली जाते. अलीकडे मात्र धान पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. या पिकासाठी अधिक पाणी लागत असल्याने अलीकडे तुलनेने धान लागवड कमी होत आहे. मात्र असे असले तरी कोकण आणि विदर्भातील बहुतांशी शेतकरी या पिकाची शेती करतात.
दरम्यान आता धान उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय संशोधकांनी धानाची एक नवीन जात विकसित केली आहे. ही जात धान उत्पादकांसाठी मोठी फायदेशीर ठरणार असून या जातीची बारामाही शेती होणार असल्याचा दावा एका मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार तामिळनाडू कृषी विद्यापीठाने काळ्या तांदळाची एक नवीन जात शोधून काढली आहे.
कवुनी CO 57 असे या नवीन जातीचे नाव असून या जातीच्या काळ्या तांदळाची उत्पादनक्षमता इतर काळ्या तांदळाच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा आहे. विशेष म्हणजे या जातीच्या तांदळात अधिक पोषक घटक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने देखील ही जात फायदेशीर राहणार आहे. तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या या काळ्या भाताच्या जातीपासून हेक्टरी 46 क्विंटल इतकं उत्पादन मिळणार आहे. विशेष म्हणजे या जातीच्या पिकाची लागवड कोणत्याही हंगामात करता येणे शक्य असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही नव्याने विकसित झालेली जात एक गेम चेंजर सिद्ध होणार आहे. या नव्याने विकसित झालेल्या जाती संदर्भात तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या कुलपती गीतालक्ष्मी यांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, ही जात इतर जातीच्या तुलनेत अधिक उत्पादन देणारी असून या जातीला बारामाही उत्पादित केल जाण शक्य होणार आहे. ही जात रोवणी केल्यानंतर 130 ते 135 दिवसात काढणीसाठी तयार होत असते.
इतर जातीच्या तुलनेत या जातीच पिक अल्पकालावधीत काढण्यासाठी तयार होते. एवढेच नाही तर ही नव्याने विकसित झालेली जात रोगप्रतिकारक आहे. अनेक रोगांशी लढण्यास ही जात सक्षम आहे. साहजिकच, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होणार असून त्यांना यापासून अधिकचे उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे. यामुळे शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही जात एक गेम चेंजर सिद्ध होणार आहे.