Panjabrao Dakh Latest Havaman Andaj : महाराष्ट्रात सध्या थंडीचा जोर कायम आहे. अहमदनगर, नासिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाडा, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा या भागात हूडहुडी कायम आहे. किमान तापमानात घट झाली असल्याने थंडीचा जोर दिवसागणिक वाढत आहे. काही ठिकाणी थंडीची लाट देखील आली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना देखील या वाढत्या थंडीचा फटका बसत आहे.
विशेषता द्राक्ष उत्पादक बागायतदारांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्षमणी क्रॅक होत आहेत. याचा रब्बी हंगामातील पिकांना मात्र फायदा होत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. अशातच आता आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबरावं डख यांचा हवामान अंदाज समोर आला आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात 26 जानेवारीपासून म्हणजे प्रजासत्ताक दिनापासून पावसाची शक्यता आहे. म्हणजेच यंदाचा प्रजासत्ताक दिन हा पावसातच झेंडावंदन करून साजरा करावा लागणार आहे. 26 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत राज्यातील नासिक, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता डख यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पूर्व विदर्भात यादरम्यान अधिक पाऊस राहणार आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी हलका पाऊस कोसळणार आहे. तसेच नाशिक व आजूबाजूच्या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. निश्चितच पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज सत्यात उतरला तर शेतकरी बांधवांसाठी मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत.
यामुळे फळबाग पिकांसमवेतच रब्बी हंगामातील पारंपारिक पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिक व्यवस्थापनासाठी आतापासूनच उपाययोजना करून ठेवणे अत्यावश्यक ठरणार आहे.
तसेच जर पिकांना फवारणी करायची असेल तर उघडीप असलेल्या कालावधीतच फवारणी करून घ्यावी असा सल्ला देखील दिला जात आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाने देखील आगामी काही दिवसात राज्यात थंडीचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. किमान तापमानात वाढ होईल असं हवामान विभागाने स्पष्ट केल आहे.