Parner Politics : अगोदर काँग्रेस, नंतर कम्युनिष्ठ आणि गेली १५ वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला पारनेर मतदारसंघ गेल्यावेळी लंकेंनी राष्ट्रवादीकडे खेचून आणला. विजय औटींची सलग तीन पंचवार्षिकची सत्ता, गेल्यावेळी ६१.७ टक्के मते घेऊन लंकेंनी ताब्यात घेतली. आता लंके खासदार झालेत. त्यामुळे त्यांच्याजागी त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांना तिकीट मिळावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. आजही आहे. मात्र राष्ट्रवादीचाच सहकारी पक्ष असलेल्या ठाकरे गटाने, येथे यल्गार केलाय. लंकेंच्या बालेकिल्ल्यात अस्मिता मेळावा घेत, या मतदारसंघात शिवसैनिकांनी मशाल पेटवलीय.
या मशालीच्या तेजाने लंकेंच्या कुटुंबाचे विधानसभेत जाण्याचे मनसूबे काजळणार का, हा खरा प्रश्न आहे. कारण लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने लंकेंना तब्बल ३८ हजार १०० मतांचे लीड दिले होते. पण त्यात ठाकरे गटाचा सिंहाचा वाटा होता, असे शिवसेनेचे कार्यकर्ते आता उघड बोलून दाखवताहेत. लंके- ठाकरे गटाच्या या शितयुद्धामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी टिकेल का, अशी शंका आहे. शिवाय या दोघांच्या भांडणात विखे आपल्या सोंगट्या फिरवून तिसऱ्याचा लाभ करुन देणार का, याही शंका आहेत.पारनेर मतदारसंघात काय चाललंय, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

पारनेर मतदारसंघावर ठुबे, झावरे, औटी यांचंच वर्चस्व. अगदी कोपरगावचे शंकरराव काळे हेही या मतदारसंघातून सुरुवातीला दोन वेळा आमदार झाले. त्यानंतर शिवसेनेची चलती वाढली आणि सबाजीराव गायकवाड, विजय औटींनी शिवसेनेला घराघरात पोहोचवली. २०१४ पर्यंत शिवसेनेच्या लोकप्रियतेच्या जोरावर विजयराव भास्करराव औटी सलग तीन टर्म आमदार राहिले. 2018 ला उद्धव ठाकरेंच्या पारनेरच्या सभेत गोंधळ झाला अन् स्थितीच बदलली. या गोंधळाचे खापर निलेश लंके यांच्यावर फोडून शिवसेनेने लंकेंची पक्षातून हाकालपट्टी केली अन् लंकेंचा आमदार होण्याचा मार्ग तयार झाला. लंकेंनी थेट पवारांना गाठत राष्ट्रवादीत प्रवेश केला अन् राष्ट्रवादीतून उमेदवारी करुन गुरुचाच पराभव केला. त्यावर्षी शिवसेना १५ वर्षांत पहिल्यांदा हारली. त्यानंतर शिवसेनेचेही दोन गट झाले. मात्र हा तालुका उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणे राहिला. त्याचाच परिपाक म्हणून या तालुक्याने लोकसभेला निलेश लंके यांना, सुजय विखेंच्या विरोधात तब्बल ३८ हजारांचं लीड दिलं.
निलेश लंके खासदार झाले. आता त्यांच्या जागी आमदारकीला कोण, या चर्चा सुरु झाल्या. सुरुवातीला राणी लंकेंना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी चर्चेत आणलं. राणी लंके याच आमदार होतील, अशा गप्पा रंगू लागल्या. मात्र या चर्चा होत असताना ठाकरे गटात मात्र अस्वस्थता पसरली. शिवसेना तालुकाप्रमुख डाँ. श्रीकांत पठारे, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले आदींसारखे काही इच्छुक नाराज झाले. त्याचा प्रत्यय वेळोवेळी यायला लागला. या दोघांनीही मध्यंतरी थेट मातोश्री गाठत तालुक्यातील सत्यपरिस्थिती थेट उद्धव ठाकरेंसमोर मांडली. शिवाय आपण इच्छुक असल्याचेही त्यांच्या कानावर घातले, अशाही चर्चा झाल्या. लंके खासदार झाल्यानंतर ठाकरे गटाने नगरमध्ये मेळावा घेतला. त्या मेळाव्यात पारनेर मतदारसंघ ठाकरे गटाकडे घेण्याचा शब्द स्वतः संजय राऊत यांनी दिल्याचेही काहींचे म्हणणे होते. तर दुसरीकडे निलेश लंके यांनीच स्वतः हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडणार असल्याचा शब्द लोकसभेपूर्वी दिला होता, असेही काहींचे म्हणणे होते.
आता विधानसभा जसजशी जवळ येऊ लागलीय, तसतसा ठाकरे गटही आक्रमक होताना दिसत आहे. दोन दिवासांपूर्वी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या मतदारसंघात थेट अस्मिता मेळावा घेतला. त्यावेळी ठाकरे गटाने येथे भव्यदिव्य शक्तीप्रदर्शन केलं. या मेळाव्यातही अंधारे यांनी लंके यांना आपला शब्द पाळण्याचे आव्हान केले. पारनेरच्या जागेसाठी ठाकरे गट अचानक आक्रमक झाला आहे. या आक्रमकतेपुढे लंके माघार घेणार का, हा खरा प्रश्न आहे. शरद पवारांनी या जागेवर दावा कायम ठेवल्यास किंवा लंकेंनी आग्रह कायम ठेवल्यास या मतदारसंघात ठाकरे गटाकडून बंडखोरी होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. दुसरीकडे वाद विकोपाला जावून आघाडीत बिघाडी होण्याच्या चर्चाही वाढत आहेत.या मतदारसंघात खरी रंगत येणार आहे ती महायुतीच्या उमेदवारानंतर… कारण शिंदे गट, अजितदादा गट आणि भाजपही येथे दावा सांगतोय. या तिघांकडेही उमेदवारी करेल, असे नेते येथे आहेत. त्यातही सुजय विखे गट कोणाला सपोर्ट करणार, विजय सदाशिव औटी काय करणार, सुजीत झावरे कसा निर्णय घेणार, हे मुद्देही निवडणुकीचे की-पाँईंट ठरणार आहेत.