बरेच शेतकरी आता दीर्घ कालावधीत उत्पादन देणाऱ्या पिकांऐवजी कमीत कमी कालावधीत आणि कमीत कमी खर्चात चांगला आर्थिक नफा देतील अशा पिकांच्या उत्पादनाकडे वळताना दिसून येतात. या अनुषंगाने बरेच शेतकरी भाजीपाला पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात.
आपल्याला माहित आहे की, बरीच भाजीपाला पिकांचा कालावधी हा खूप कमी असतो व खर्च देखील कमी लागतो व त्या दृष्टिकोनातून आर्थिक उत्पन्न मात्र जास्त मिळत असते.

त्यामुळे तुमचा देखील कमीत कमी कालावधीत चांगले आर्थिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करण्याचा प्लॅनिंग असेल तर तुम्ही ऑगस्टमध्ये काही भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करून चांगला पैसा मिळवू शकतात. याच पिकांची माहिती थोडक्यात बघू.
ऑगस्ट महिन्यामध्ये करा या पिकांची लागवड आणि मिळवा कमी वेळेत चांगले पैसे
1- भेंडी– भाजीपाला पिकांमध्ये भेंडी हे आर्थिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे पसंतीचे असे पीक आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात शेतकरी भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.
जर ऑगस्टमध्ये भेंडीची लागवड केली तर उशिरा परिपक्व होणाऱ्या भेंड्यांच्या जाती नोव्हेंबर पर्यंत काढण्यास तयार होतात. त्यामुळे चांगला नफा या पिकाच्या माध्यमातून मिळू शकतो.
2- फुलकोबी आणि कोबी– फुलकोबी किंवा कोबी लावण्यासाठी ऑगस्ट हा एक चांगला कालावधी असून या महिन्याच्या सुरुवातीला रोपवाटिका तयार करून तुम्ही सुरुवात करू शकता आणि साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत लागवड करू शकतात.
कोबी हे पीक 70 ते 80 दिवसांमध्ये परिपक्व होते. साधारणपणे बाजारपेठेमध्ये कोबीला बऱ्यापैकी मागणी ही कायम असते व त्यामुळे या माध्यमातून चांगली कमाई होऊ शकते.
3- पालक– पालक ऑगस्टमध्ये चांगल्या प्रकारे वाढते.लागवडीनंतर साधारणपणे 25 ते 30 दिवसांमध्ये काढणीस तयार होतो. त्यामुळे पटकन नफा मिळवायचा असेल तर पालक लागवड हा उत्कृष्ट पर्याय आहे.
परंतु पावसाळ्यामध्ये पालक या पालेभाजीची खूप काळजी घ्यावी लागते. जास्त पाणी साचू नये किंवा ओलाव्यापासून सुरक्षित राहावे याकरिता गादीवाफा पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे.
4- टोमॅटो– सध्या टोमॅटोला चांगली मागणी असल्यामुळे शेतकरी देखील आता मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड करताना दिसून येत आहे. रोपवाटिका तयार करून किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला बियाणे लागवड करता येते.
साधारणपणे लागवडीनंतर 65 ते 70 दिवसात टोमॅटो काढणीस तयार होते. टोमॅटोचे पिकाची व्यवस्थापन करताना वेलीना आधार देणे तसेच मल्चिंगचा वापर किंवा गादीवाफा इत्यादी पद्धतीचा व्यवस्थापनामध्ये वापर करावा.
5- ग्रीन बीन्स किंवा फरसबी– ऑगस्ट महिन्यात लागवडीसाठी हे उत्कृष्ट पीक आहे. ग्रीन बीन्स या पिकाची वाढ झपाट्याने होते व 50 ते 60 दिवसांमध्ये ते काढणीस येते.
याला बाजारात देखील मागणी चांगली असते व ते कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये घेतले जाऊ शकते. त्यामुळेच कमी वेळ चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
6- ढोबळी मिरची– ऑगस्ट महिन्यातील हवामान ढोबळी मिरचीसाठी अनुकूल समजले जाते. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये रोपांची लागवड करता येऊ शकते. जेव्हा ढोबळी मिरचीची पुरेशी वाढ होईल तेव्हा तिला आधार देणे गरजेचे असते.
साधारणपणे लागवडीनंतर 70 ते 80 दिवसात ढोबळी मिरची काढणीस तयार होते. बाजारपेठेत देखील ढोबळी मिरचीला चांगली मागणी असते. ढोबळी मिरचीचे व्यवस्थापन उत्तम केल्यास शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळू शकतो.