Ahmednagar News: विधानसभा निवडणूक आता ज्या पद्धतीने जवळ यायला लागली आहे तसे संपूर्ण राज्यातील राजकारण आता अनेक मुद्यांना धरून तापायला लागलेले आहे. अनेक पक्षांच्या माध्यमातून आता मोर्चेबांधणी केली जात असून अगदी खालच्या फळीतील कार्यकर्त्यांवर देखील आता विशेष लक्ष दिले जात असून प्रत्येक पक्षाकडून कार्यकर्त्यांची मोटबांधणी देखील सुरू असल्याचे चित्र आहे.
तसेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत असून पक्ष व नेत्यांमध्ये आता निवडणुकीच्या संदर्भातली प्लॅनिंग सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत असून बऱ्याच मुद्द्यांवर विरोधक आता सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

अगदी अशाच पद्धतीचे राजकारण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील दिसून येत आहे. कोपरगाव मध्ये विवेक कोल्हे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या विरोधामध्ये चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये युवा नेते विवेक कोल्हे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आमदार आशुतोष काळे यांच्यावर अनेक मुद्द्यांना धरून जोरदार हल्ला चढवलेला आहे.
विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार आशुतोष काळे यांच्यावर चढवला हल्ला
कोपरगावमध्ये सध्या विवेक कोल्हे आणि आमदार आशुतोष काळे यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याचे आपल्याला दिसून येत आहे. विवेक कोल्हे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आमदार काळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असून लोकांचा रोजगार तसेच कोपरगाव शहरातील वाढलेली गुन्हेगारी इत्यादी वरून आमदार काळेंना त्यांनी खडे बोल सुनावले आहेत.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी म्हटले की आम्ही युवकांना रोजगार मिळावा याकरिता मेळावे घेतले. परंतु काळे यांनी फक्त दोन नंबर वाल्यांचे धंदे वाढवले असा स्वरूपाचा गंभीर आरोप त्यांनी केला. द आमदार आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असून विवेक कोल्हेंनी 3000 कोटींच्या विकास कामांच्या हिशोबाचे चॅलेंज दिले असून अजित दादांचा हा शिलेदार या चॅलेंजला सामोरे जाणार का? या स्वरूपाची खमंग चर्चा कोपरगावकरांमध्ये रंगल्याचे चित्र आहे.
पुढे बोलताना विवेक कोल्हे यांनी म्हटले की, आशुतोष काळे यांनी स्मार्ट सिटी घालवली तसेच युवकांच्या हक्काचा जो काही रोजगार होता तो बुडवला. तसेच वाढत्या गुन्हेगारीमुळे कोपरगाव तालुक्यातील विकासाचा वेग मंदावला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. कोपरगाव शहरातील गुन्हेगारीला कोणाचे पाठबळ आहे हे सगळ्यांना माहिती आहे आमच्यावर टीका केल्याशिवाय आशुतोष काळे यांना मत मिळणार नाहीत.
त्यामुळे ते कोणत्या ना कोणत्या कारणाने आमच्यावर टीका करत राहतात. जेव्हा हक्काचे पाणी मिळत होते तेव्हा त्याच्या विरोधात ते गेले व समन्यायी पाणी वाटप कायदा होताना ते गप्प बसले होते. त्यामुळे आता कितीही तळे बांधले तरी त्याचा काही फायदा होणार नसल्याचा टोला देखील विवेक कोल्हे यांनी काळे यांना लगावला.
नगरपालिका हद्दीत झालेल्या कामांचे ऑडिट करण्याची मागणी
कोपरगाव तालुक्यातील पाच नंबर तलावाची खोली आणि रुंदी मोजावी अशा प्रकारची मागणी नागरिकांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. परंतु आमदार काळे यांनी घाईघाईने जलपूजन केले. त्या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाला असून नगरपालिका हद्दीत झालेल्या कामाची ऑडिट झाले पाहिजे. आशुतोष काळे यांचे तीन हजार कोटींचा विकास फक्त फ्लेक्स वर दिसतो जमिनीवर मात्र काहीही अस्तित्व दिसत नाही.
त्यामुळे त्यांना चॅलेंज आहे की,त्यांनी आंबेडकर चौकात येऊन तीन हजार कोटींच्या कामावर चर्चा करावी या प्रकारचे थेट आव्हान विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिले आहे.त्यामुळे भर चौकात तीन हजार कोटींच्या कामाचा हिशोब देण्याचे आव्हान विवेक कोल्हे यांनी आमदार काळे यांना केल्यामुळे आता आमदार आशुतोष काळे कशा प्रकारचे उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.