Prime Minister Narendra Modi’s speech : आज अहमदनगर मधील शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. मागील काही दिवसांपासून अहमदनगरच्या राजकारणात चांगलीच चर्चेत असणारी ही सभा व कार्यक्रम आज पार पडले.
शिर्डीमधून पंतप्रधान मोदी यांनी जवळपास ७ हजार ५०० कोटींच्या कामाचे उदघाटन व लोकार्पण केले. या कार्यक्रमानंतर मोदी यांची सभा झाली.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/10/ahmednagarlive24-ahmednagarlive24-Screenshot-2023-10-26-at-9.09.03 PM.jpg)
या सभेत त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. जास्त राजकीय टीका न करता त्यांनी केलेल्या विकासकामांवर भर टाकलेला दिसला.
बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सभेला मराठीतून सुरुवात केली. तसेच ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच आज निधन झालं. हा देखील उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली.
निळवंडेवरुन घणाघात
मोदी यांनी निळवंडेच्या पाण्यावरूनही विरोधकांवर निशाणा साधला. १९७० मध्ये या प्रकल्पास स्विकृती मिळाली होती. परंतु ५० वर्षे हे काम झाले नाही. आम्ही सत्तेत आल्यावर कामावर लक्ष केंद्रित केले व आज हा प्रकल्प आम्ही लोकार्पण केला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर मताचं राजकारण करणाऱ्यांनी शेतकऱ्यांना थेंब थेंब पाण्यासाठी वेठीला धरलं असंही घणाघात त्यांनी केला. आमचं सरकार आलं आणि आम्ही यावर वेगात काम सुरु केलं, आता डाव्या कालव्यातून लोकांना पाणी मिळेलच पण आता लवकरच उजव्या कालव्यातून देखील पाणी मिळेल असे ते म्हणाले.
३६ योजनांचे आश्वासन
राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी बळीराजा जलसंजीवनी योजनाही वरदान ठरली आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील आणखी ३६ सिंचन योजना केंद्र सरकार पूर्ण करेल, दुष्काळाने होरपळणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल असेही आश्वासन त्यांनी दिले.
नमो शेतकरी महासन्मान योजना
राज्याने केंद्राच्या धर्तीवर सुरु केलेल्या या योजनेचेही मोदींनी कौतुक केले. शेतकऱ्यांना आता वर्षाला केंद्राकडून सहा हजार व राज्याकडून सहा हजार रुपये मिळतील. हे शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरेल असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ चे आवाहन
निळवंडेतून पाणी मिळणं सुरु झालेलं असून हा एक शिर्डीतील साईबाबांच्या पावनभूमीतील परमात्म्याचा प्रसाद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील एक थेंबही पाणी वाया जाऊ देऊ नये. ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ याअंतर्गत जेवढी पण अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण वापर करावा असेही आवाहनही यावेळी मोदींनी केले.
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांवर टीका
सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी मोदी यांनी शरद पवारांचे नाव घेतले नाही परंतु सर्व रोख त्यांच्याकडेच होता. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता, केंद्रामध्ये अनेक वर्षे कृषी मंत्री राहिला परंतु शेतकऱ्यांसाठी काहीच भरीव कामगिरी त्यांनी केलेली नाही. त्याचबरोबर काही उदाहरणाचे दाखले देत त्यांनी शरद पवारांवर टीका केली.