Pune Local Train : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणापासूनच लपून राहिलेला नाही. पुणेकरांना गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतोय आणि यामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे पुणे, राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे, शिक्षणाचे माहेरघर पुणे आता वाहतूक कोंडीमुळे ओळखले जाऊ लागले आहे.
मुंबई प्रमाणेच पुण्यातही आता मोठी वाहतूक कोंडी होते आणि यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसतोय. खरे तर पुणे शहरातील या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून शहरातील रस्त्यांची क्षमता वाढवली जात आहे. शहरात नवीन आणि मोठे रस्ते तयार केले जात आहेत.

सोबतच नवनवीन उड्डाणपूल सुद्धा विकसित होत आहेत. दुसरीकडे पुणेकरांसाठी मेट्रो देखील सुरू करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून लवकरच हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो सुरू केले जाणार आहे.
याशिवाय महा मेट्रो कडून सध्याच्या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण देखील केले जाणार आहे. मात्र या सर्व उपाययोजना करूनही आजही पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दररोज ऐरणीवर येतो. दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी मुंबई प्रमाणेच पुण्यातही लोकल ट्रेनचे नेटवर्क तयार व्हावे अशी आग्रही मागणी सरकारकडे उपस्थित केली आहे.
आमदार शिवतारे यांची मागणी काय?
खरे तर सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान याच पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
तसेच यावेळी त्यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही उपाय सुद्धा सुचवले आहेत. शिवतारे यांनी पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुण्याहून राजेवाडी नीरा, जेजुरी, दौंड, फलटण लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली.
या मार्गांवर लोकल सुरू झाले तर दहा ते वीस हजार कर्मचाऱ्यांना फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच शिवतारे यांनी यावेळी लोणावळा-पुणे लोकल फेऱ्याही वाढवाव्यात अशी सुद्धा मागणी केली.
तसेच पुण्यात क्लस्टर योजना राबवून रस्ते रुंद करावेत आणि मुंबईच्या धरतीवर पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठी लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी यावेळी त्यांनी उपस्थित केली. मेट्रो आणि पीएमपीएमएलची कनेक्टिव्हिटी सुधारावी, अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.
दरम्यान विजय शिवतारे यांच्या या मागण्यांवर सरकारकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधिमंडळात विजय शिवतारे यांच्या या मागणीवर उत्तर देताना विजय शिवतारे यांच्या सर्व सूचना गांभीर्याने घेतल्या जातील, यावर गांभीर्याने विचार केला जाईल अशी ग्वाही सभागृहाला दिली आहे.