Pune Metro News:- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर हे राज्यातील एक महत्त्वाचे शहर असून वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये पुण्याची गणना होते. यामुळे पुणे शहरात वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत व त्यातीलच महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे पुणे मेट्रो होय.
पुणे शहरामध्ये मेट्रोचे जाळे विकसित करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असून जास्तीत जास्त प्रमाणात पुणेकरांना मेट्रोचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहेत. अगोदर पुण्यामध्ये जे मेट्रो मार्गिका सुरू आहेत त्यांना प्रवाशांचा खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळताना दिसून येत असून अनेक पुणेकर मेट्रो प्रवासाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे आता पिंपरी ते निगडी येथील भक्ती शक्ती चौकापर्यंत देखील आता मेट्रो धावणार आहे. त्यासंबंधीची महत्त्वाची अपडेट आपण या लेखात बघणार आहोत.
पिंपरी ते निगडीतील भक्ती शक्ती चौकापर्यंत धावणार मेट्रो
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पिंपरी ते निगडी येथील भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून याविषयीच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाच्या माध्यमातून सोमवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता पुणेकरांचे निगडी पर्यंत मेट्रोचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
निगडी पर्यंतच्या मेट्रो मार्गाची काय आहे पार्श्वभूमी?
जर आपण पुण्यातील मेट्रोचा विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये पिंपरी ते दापोडी हा 7.9 किलोमीटरचा मार्ग 1ऑगस्ट 2023 पासून सुरू झालेला आहे व पिंपरी ते फुगेवाडी हा मार्ग सहा मार्च 2022 पासून सुरू झालेला आहे. या मार्गांसोबतच पिंपरी ते निगडी या 4.13 किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम सुरू करावे अशी पुणेकरांची मागणी होती. याकरिता आंदोलने देखील करण्यात आलेली होती.
या सगळ्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारच्या माध्यमातून निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाला मान्यता देण्यात आलेली होती. यासंबंधीचा प्रस्ताव दोन वर्षापासून केंद्र सरकारकडे रखडलेला होता व अखेर केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाचे उपसचिव सुनील कुमार यांनी निगडी पर्यंत मेट्रोला मान्यता दिल्याचे पत्र राज्य सरकारला पाठवले असून आता निगडीतील भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कसा असणार आहे हा मार्ग?
या विस्तारित मार्गावर चिंचवड स्टेशन या ठिकाणाचे पिंपरी पोलीस ठाणे, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि निगडीतील भक्ती शक्ती समूह शिल्पचौक असे तीन स्टेशन असणार आहेत. हा 4.13 किलोमीटर लांबीचा मार्ग असून तो एलिवेटेड कॉरिडॉर म्हणजेच उन्नत मार्ग असणार आहे.
या संपूर्ण मार्गाकरिता जो काही खर्च येणार आहे तो केंद्र सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका सारख्या प्रमाणामध्ये करणार आहे. या प्रकल्पाकरिता साधारणपणे 910.18 कोटी रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. या मार्गाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामुळे निगडी ते दापोडी या मुख्य मार्गावर १२.५० किलोमीटर अंतराची मेट्रो प्रवासी सेवा देखील उपलब्ध होणार आहे.