Pune Metro : तुम्हीही पुणे मेट्रोने प्रवास करता का ? अहो, मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, सध्या स्थितीला पुणे शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. महामेट्रोकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो चालवली जात आहे. महत्त्वाची बाब अशी की या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण देखील प्रस्तावित करण्यात आले आहे.
स्वारगेट ते कात्रज आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी या दोन कॉरिडॉरच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. हे दोन्ही विस्तारित मेट्रो मार्ग प्रकल्प केंद्राकडून मंजूर करण्यात आले आहेत. सध्या या प्रकल्पांचे काम सुरू आहे.

यातील स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्ग प्रकल्पाला ऑक्टोबर 2023 आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी या मेट्रो मार्ग प्रकल्पाला ऑगस्ट 2024 मध्ये केंद्राची मंजुरी देण्यात आली आहे. दुसरीकडे आता याच विस्तारित मेट्रो मार्ग प्रकल्पाच्या अनुषंगाने मेट्रोच्या ताफ्यात नव्या मेट्रो सामील करण्यात आल्या आहेत.
पुणे मेट्रोच्या ताफ्यात 15 नव्या गाड्या दाखल
मिळालेल्या माहितीनुसार पुणे मेट्रोच्या ताफ्यात 15 नव्या गाड्या दाखल होणार आहेत. या 15 गाड्यांमध्ये एकूण 45 कोचेस असतील, म्हणजे एका गाडीला तीन कोचेस असतील. त्यामुळे साहजिकच पुणे मेट्रोची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या स्थितीला पुणे मेट्रो कडे 34 गाड्या आहेत. या 34 गाड्यांमध्ये एकूण 102 कोचेस आहेत. यातून दररोज 1.7 लाख प्रवासी प्रवास करत आहेत.
मात्र पुणे मेट्रोच्या ताफ्यात नव्या गाड्या समाविष्ट झाल्यानंतर गाड्यांची संख्या थेट 49 वर पोहोचेल आणि कोचेस ची संख्या 147 होईल. ही गाड्यांची नवीन खेप अलीकडेच मंजूर करण्यात आलेल्या स्वारगेट ते कात्रज आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्ग प्रकल्पांना सपोर्ट करण्यासाठी आहे.
नवीन गाड्या कधी दाखल होणार?
पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी या संदर्भात मोठी माहिती दिली आहे. ते म्हणालेत की, नवीन मेट्रो मार्गांना मान्यता मिळाल्यानंतर अधिक गाड्या वाढवणं आवश्यक झालं आहे. सध्या सात मिनिटांची असलेली गाड्यांची वारंवारता पाच मिनिटांवर आणण्याचा, आणि गर्दीच्या वेळेत ती तीन मिनिटांपर्यंत आणण्याचा आमचा उद्देश आहे.
म्हणजेच गर्दीच्या वेळेत प्रत्येक तीन मिनिटाला मेट्रो चालवण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. शिवाय, मागणीनुसार सध्या सुरू असलेल्या तीन डब्यांच्या गाड्यांमध्ये वाढ करून त्या सहा डब्यांपर्यंत वाढवण्याचाही विचार केला जात आहे. पुणे मेट्रोचे जनसंपर्क व प्रशासन संचालक हेमंत सोनवणे यांच्या मते, मेट्रोचा प्रवासी संख्येचा आकडा सातत्याने वाढत असून, फीडर सेवेमुळे नव्या प्रवाशांना आकर्षित करण्यात मदत होत आहे.
सोनवणे यांनी सांगितल्याप्रमाणे, सध्या 34 पैकी 31 मेट्रो गाड्या सेवेत आहेत, आणि आणखी दोन लवकरच सेवेत दाखल होणार आहेत. तसेच ज्या 15 गाड्या नव्याने मागवलेल्या आहेत त्या गाड्या पुढील दोन वर्षांत प्रशासनाकडे उपलब्ध होणार आहेत.