पुणे – नाशिक औद्योगिक महामार्गाबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाचा नवा अहवाल ! ‘या’ भागातून एक्सप्रेस वे तयार करणे अव्यवहार्य

पुणे ते नाशिक दरम्यानचा प्रवास दोन ते अडीच तासात व्हावा या अनुषंगाने पुणे - नाशिक औद्योगिक महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. आता याच प्रस्तावित महामार्ग प्रकल्पाच्या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Published on -

Pune Nashik Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झाले असून यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान झाला आहे.

याशिवाय राज्यात इतरही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. या प्रस्तावित प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत तर काही प्रकल्पांची कामे आगामी काळात सुरू होणार आहेत. खरेतर महाराष्ट्रात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 4217 km लांबीच्या रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या अंतर्गत राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली असून पुणे – नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प देखील महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे.

हा महामार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रस्तावित करण्यात आला असल्याने या मार्गाचा पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तीनही जिल्ह्यांना फायदा होणार आहे. दरम्यान आता याच महामार्ग प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे.

काय आहेत डिटेल्स?

पुणे ते नाशिक यादरम्यान चा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने अहिल्यानगर मार्गे नवीन औद्योगिक महामार्ग विकसित करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतलेला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या महामार्गाचे अलाइनमेंट म्हणजे संरेखन पूर्ण करण्यात आले असून याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी सुद्धा दिलेली आहे. मात्र या प्रस्तावित प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध करण्यात आला. परिणामी या प्रस्तावित मार्गाचे संरेखन बदलण्यात यावे अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्यात.

औद्योगिक महामार्गासाठी नव्याने भूसंपादनाची गरज पडू नये जेणेकरून शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार नाहीत हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून राज्य सरकारकडून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला समांतर असा हा महामार्ग तयार करता येईल का ? या दृष्टीने अभ्यास करण्याची सूचना राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आली होती.

दरम्यान राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने याचा सविस्तर अभ्यास पूर्ण केला असून पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्पाला समांतर महामार्ग तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून समोर येत असल्याचा दावा एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.

तसेच मूळ संरेखनानुसार हा शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव सरकारकडे सादर झाला असून या प्रस्तावावर लवकरच सरकारकडून निर्णय होणे अपेक्षित असल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान हा औद्योगिक महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते नाशिक हा प्रवास अवघ्या दोन ते अडीच तासात शक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!