Pune New Flyover : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यातील एका महत्त्वाच्या महामार्गावर सहा पदरी उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे. या नव्या उड्डाणपुलामुळे पुणे ते सोलापूर दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.
खरे तर सध्या स्थितीला पुणे ते सोलापूर या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. दरम्यान हेच समस्या दूर करण्यासाठी आता या राष्ट्रीय महामार्गावर एका नव्या उड्डाणपुलाची निर्मिती केली जाणार आहे.

इथे विकसित होणार नवा उड्डाणपूल
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हडपसर ते यवत या दरम्यान सहापदरी उन्नत रस्ता विकसित केला जाणार आहे सोबतच सध्याच्या रस्त्याचे सहा पदरी करण्यात येणार आहे.
महत्त्वाची बाब अशी की या प्रकल्पाची निर्मिती बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजेच बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर केली जाणार आहे. याचा शासन निर्णय हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
प्रकल्पासाठी किती खर्च होणार
या प्रकल्पासाठी जवळपास 5262 कोटी 36 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा हडपसर ते यवत हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. पण या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी जाणवते.
पुणे व सोलापूर जिल्ह्यातील शेतमाल, औद्योगिक उत्पादन आणि व्यावसायिक वाहतूक या मार्गावर अवलंबून असल्याने, या मार्गाचे चौपदरीकरण आणि उन्नतीकरणाची आवश्यकता भासत होती आणि याच अनुषंगाने हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
आता या प्रकल्पाच्या अंतर्गत नवीन सहा पदरी उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, सध्या अस्तित्वात असलेला रस्ताही सहा पदरी करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत बोलायचं झालं तर याची अंमलबजावणी एम एस आर डी सी अर्थातच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करणार आहे.
विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन सुद्धा राज्य रस्ते विकास महामंडळाकडूनच केले जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून या कामासाठी वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षात हे काम पूर्ण होईल असा विश्वास संबंधितांकडून व्यक्त केला जातोय.