Pune News : पुणे–मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा थेट फटका हजारो प्रवाशांना बसला आहे. या अपघातामुळे द्रुतगती मार्गावर तब्बल ३० किलोमीटरपर्यंत भीषण वाहतूक कोंडी झाली असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बससेवा तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवार संध्याकाळी झालेल्या या अपघातानंतर गेल्या सुमारे २० तासांपासून महामार्गावरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन आणि पुण्याकडे येणाऱ्या दोन लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

या कोंडीत शेकडो खासगी वाहने, मालवाहू ट्रक तसेच एसटी महामंडळाच्या अनेक बसेस अडकून पडल्या आहेत. दीर्घ काळ वाहनांत अडकून राहिल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले असून, उष्णता, पाणी आणि अन्नटंचाईमुळे अनेक प्रवासी अस्वस्थ झाल्याचे चित्र दिसून आले. काही प्रवासी तर वाहनांतून खाली उतरून मदतीची वाट पाहताना दिसले.
अपघातग्रस्त टँकरमधून अद्यापही प्रोपेलिन गॅसची गळती सुरू असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. गॅस ज्वलनशील असल्याने कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.
सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक पूर्णपणे सुरळीत करता येत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये स्थानांतरित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून, ती पूर्ण झाल्यानंतरच उलटलेला टँकर बाजूला करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल, याबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नाही.
दरम्यान, द्रुतगती मार्गासोबतच जुन्या पुणे–मुंबई महामार्गावरही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पर्यायी मार्गांवर ताण वाढल्याने तेथेही अडचणी येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे वाहनचालकांनी शक्यतो द्रुतगती मार्गावरील प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच प्रवास करताना पाणी व आवश्यक अन्नसाठा सोबत ठेवावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.
एसटी बससेवा बंद राहिल्याने पुणे–मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता असून, परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत प्रवासाचे नियोजन बदलावे, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.













