Pune News : पुणे शहरातील भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. स्वारगेट आगाराकडून पुण्यातील पर्यटकांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. स्वारगेट आगारातून राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांसाठी विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे शहरातील भाविकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
स्वारगेट बस आगाराकडून राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांसाठी सहल आयोजित करण्यात आली आहे. अष्टविनायकाच्या दर्शनासाठी, राज्यातील पाच ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी यासोबतच गाणगापूर अक्कलकोट तुळजापूर आणि रायगड किल्ल्याला भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी स्वारगेट बस आगाराकडून विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.

स्वारगेट आगाराकडून चार वेगवेगळ्या बसेसची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण स्वारगेट आगारातून सुरू करण्यात येणाऱ्या या विशेष पर्यटन बस सेवा बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
राज्यातील ज्योतिर्लिंगासाठी सहल
महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी स्वारगेट आगारातून 19 जुलै ते 21 जुलै या तीन दिवसांच्या प्रवासाची सहल जाणार आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर छत्रपती संभाजी नगर मधील घृष्णेश्वर तसेच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या पाच ज्योतिर्लिंगांना भाविकांना या बससेवेच्या माध्यमातून भेटी देता येणार आहेत. यासाठी निम आराम बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूरसाठी विशेष बस
22 आणि 23 जुलै हे दोन दिवस स्वारगेट बस आगारातून अक्कलकोट तुळजापूर आणि गाणगापूरला सहल जाणार आहे. यासाठी निम आराम प्रकारातील बस उपलब्ध करून दिले जाणार आहे.
अष्टविनायक दर्शन यात्रा
राज्यातील अष्टविनायकांच्या दर्शनासाठी स्वारगेट बस आगारातून विशेष बस सेवा चालवली जाईल. ही सहल 25 आणि 26 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
रायगड दर्शन
रायगड दर्शनासाठी 30 जुलै 2025 रोजी स्वारगेट बस आगारातून विशेष बस चालवली जाणार आहे, ही सहल एका दिवसाची राहील. ही सहल रायगड किल्ल्यावर जाणार आहे.