Pune Shirur Flyover : पुण्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे, पुणे आणि नगर दरम्यानच्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून खराडी बायपास ते शिरूर या ६० किलोमीटरच्या अंतरावर तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) देखरेखीखाली पूर्ण होणार असून, त्याच्या कामास एप्रिल महिन्यात सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून औद्योगिक विकासालाही गती मिळणार आहे.
पारनेर आणि नगर परिसरातील प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहराच्या दिशेने प्रवास करताना शिक्रापुर नजीक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने वाहनचालक व प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, या समस्येवर लवकरच तोडगा निघणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून खराडी बायपास ते शिरूर या ६० किलोमीटरच्या अंतरासाठी अत्याधुनिक तीन मजली उड्डाणपुलाच्या बांधकामास एप्रिल महिन्यात प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी…
पारनेर, शिक्रापुर, लोणीकंद आणि शिरूर या मार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना होणारा विलंब आणि त्यामुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
खासदारांची संयुक्त मागणी
छत्रपती संभाजी नगर-अहिल्यानगर-पुणे या महामार्गाचे सहापदरीकरण करून काँक्रीटीकरण करण्याची मागणी खासदार नीलेश लंके, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, तसेच छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे यापूर्वीच केली होती. संसद अधिवेशनादरम्यान खासदार लंके यांनी गडकरी यांची भेट घेतली असता, खराडी बायपास ते शिरूर या मार्गावरील तीन मजली उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच, शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या महामार्गाच्या दुरुस्ती आणि विस्ताराबाबत राज्य शासनासोबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नितिन गडकरी यांची घोषणा
शिक्रापुर आणि शिरूर या मार्गावरील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मंत्री नितिन गडकरी यांनी यापूर्वीच तीन मजली उड्डाणपुलाच्या बांधकामाची घोषणा केली होती. या अनुषंगाने, या मार्गालगत असलेली अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. परिणामी, काम सुरू होण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली आहे.
राज्यातील पहिला तीन मजली उड्डाणपूल
खराडी बायपास ते शिरूर हा महामार्ग राज्यातील पहिला तीन मजली उड्डाणपूल असलेला रस्ता ठरणार आहे. हा अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) माध्यमातून बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि शिरूर दरम्यानच्या प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि वाहतुकीचा गतिरोध दूर होईल.
वाहतूक व्यवस्थेचे नियोजन
या तीन मजली पुलाच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन पुढीलप्रमाणे असेल:
- सर्वात वरच्या मजल्यावरून महामेट्रो धावणार – सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठा फायदा होईल.
- मधल्या मजल्यावर चारचाकी कार धावणार – प्रवाशांच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल.
- तळमजल्यावरून अवजड वाहने जातील – ट्रक आणि मोठ्या वाहनांसाठी वेगळी वाहतूक व्यवस्था असेल.
तसेच, शिरूर, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, लोणीकंद आणि खराडी येथे या तीन मजली उड्डाणपुलास बाह्य मार्ग जोडण्यात येणार आहेत, ज्यामुळे स्थानिक वाहतूक अधिक सोयीस्कर होईल.
खासदारांनी तीव्र विरोध दर्शविला
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने पुणे ते संभाजीनगर या महामार्गाच्या विकासासाठी पुढाकार घेतला असताना, राज्य शासनाने अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) माध्यमातून तीन टप्प्यांत करण्याची घोषणा केली आहे.
या निर्णयाला खासदार लंके यांच्यासह इतर खासदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. महामार्गाचे तीन टप्पे करून टोल आकारण्याच्या धोरणाचा सर्वसामान्य प्रवासी आणि औद्योगिक विकासावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती खासदार लंके यांनी व्यक्त केली. त्यांनी मंत्री गडकरी यांच्याशी या विषयावर चर्चा केली असून, हा महामार्ग केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे एकसंध पद्धतीने बांधला जावा, अशी मागणी केली आहे.
नवीन महामार्गामुळे औद्योगिक विकासास चालना
हा नवीन तीन मजली उड्डाणपूल आणि विस्तारित महामार्ग हा पुणे, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर या औद्योगिक वसाहतींना मोठ्या प्रमाणात चालना देईल. यामुळे वाहतूक सुलभ होऊन उद्योगधंद्यांची गती वाढेल आणि गुंतवणूकदारांसाठीही हा भाग अधिक आकर्षक ठरेल.
उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच गती
एप्रिल महिन्यात उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात होणार असून, हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. लवकरच या प्रकल्पाच्या विस्तृत आराखड्याची माहिती जाहीर करण्यात येईल.
नवीन महामार्गाच्या प्रतिक्षेत प्रवासी
या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, पुणे आणि शिक्रापूर दरम्यान वाहतूक सुरळीत होईल. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी हा महामार्ग अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.