इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला ठोकला रामराम! तरुणाने सुरु केली ‘या’ जातीची पेरूची शेती; अन मिळवले लाखोंची कमाई

Pune Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून शेती पद्धतीत मोठा बदल झाला आहे. आता पारंपारिक पद्धतीने शेती करणे ऐवजी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय केला जात आहे. शेतीला आता केवळ उपजीविकेच साधन म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून पाहण्यास सुरुवात झाली आहे.

याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी आता बाजारात जे विकेल तेच पिकेल या तंत्राचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे अनेकांनी आता पिकेल तिथेच विकेल अशी भूमिका घेतली असून स्वतःच शेतमाल उत्पादित करायचा आणि स्वतःच ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा असं नवीन विक्रीचे तंत्र आत्मसात करण्यास सुरुवात केली आहे.

याचे फलस्वरूप आता शेती व्यवसाय तोट्याचा सिद्ध न होता लाखो रुपयांचे उत्पन्न कमवून देणारा व्यवसाय बनला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील एका तरुणाने देखील शेतीचे हे महत्त्व ओळखून आपल्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला रामराम ठोकत शेती व्यवसायात स्वतःला झोकुन दिल आहे. इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील अक्षय भाऊसाहेब देवकर या तरुणाची ही गोष्ट आहे.

हे पण वाचा :- Soybean Market : सोयाबीनची आवक विक्रमी घटली; भाव वाढीचे संकेत की अन्य कारण? पहा

अक्षय यांनी पुण्यातील सिंहगड या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधलं आपलं अभियांत्रिकीचे शिक्षण अर्ध्यावर सोडून शेती व्यवसायात नवीन करिअरची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या दोन एकर शेतीत पेरूची लागवड करून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या अक्षय यांनी घेतलेल्या या जोखीमेला दाद दिली जात आहे.

भाटनिमगाव व आजूबाजूच्या परिसरात पूर्वी म्हणजे उजनी धरण होण्याअगोदर मका, बाजरी, ज्वारी यांसारखी पिके घेतली जात होती. यानंतर मात्र उजनी धरणाचा जलाशय लाभल्याने भाटनिमगाव परिसरात ऊस या बागायती पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होऊ लागली. येथील शेतकऱ्यांना या पिकातून चांगली कमाई देखील झाली.

मात्र गेल्या काही वर्षांपासून अतिरिक्त उसाचा प्रश्न आणि कारखानदारांकडून वेळेवर उसाचे पेमेंट न होणे यामुळे ऊस उत्पादक पुरता कोलमडला आहे. परिणामी आता या भागात पर्यायी पिकांचा विचार केला जाऊ लागला आहे. अक्षय यांचे वडील देखील ऊस पिकाची शेती करायचे. अक्षय मात्र ऊस पिकाला पर्याय पीक म्हणून पेरूची शेती करण्यास उत्सुक होते.

हे पण वाचा :- आदमापूरच्या बाळूमामा भंडारा उत्सवातील भाकणूक; शेतीसाठी कसं राहणार हे साल, पाणी पाऊस कसा राहणार? कृष्णा डोणे वाघापूरकर यांची भाकणूक, पहा

ते सांगतात की पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत त्यांनी पेरूची मोठ्या प्रमाणात विक्री होताना पाहिली. यातून त्यांना पेरू लागवडीची कल्पना सुचली. आपल्या दोन एकरात त्यांनी पेरू शेतीचा निर्णय घेतला आणि यासाठी शिक्षणाला त्यांनीत्याग पत्र दिलं. त्यांनी त्यांच्या वडिलांना याबाबत कल्पना दिली आणि पेरूची शेती कशा पद्धतीने त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते याबाबत वडिलांना पटवून दिले.

वडीलांची मंजुरी मिळाली आणि मग त्यांनी तैवान पिंक जातीच्या रोपे मागवली आणि पेरू लागवड केली. लागवडीनंतर बागेची व्यवस्थितरित्या काळजी घेतली. योग्य व्यवस्थापन झाल्याने मात्र दहा महिन्यात यातून त्यांना उत्पादन मिळाले. माल चांगला निघाला म्हणून पन्नास रुपये दर मिळाला. यातून त्यांना लाखोंची कमाई झाली आहे.

निश्चितच शेतीत आता राम उरला नाही, शेती म्हणजे तोट्याचाच व्यवसाय आहे, अशी ओरड असताना अक्षय यांनी इंजीनियरिंगच्या शिक्षणावर तुळशीपत्र ठेवत सुरू केलेली पेरू शेती आणि मिळवलेली लाखोंची कमाई ही इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.

हे पण वाचा :- युवा शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी! टोमॅटो पिकातून साधली आर्थिक प्रगती, ‘अस’ केलं नियोजन