Talegaon-urli New Railway Route:- पुणे शहर म्हटले म्हणजे प्रचंड प्रमाणात गजबजलेले शहर म्हणून ओळखले जाते व वेगाने होणारा विकास हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे आपल्याला दिसून येते. वाढते औद्योगीकरण तसेच आयटी हब म्हणून वेगाने विकसित झालेल्या पुणे शहराचा विचार केला तर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाचे असलेले अनेक मार्ग देखील या शहरातून जातात.
यामध्ये अनेक रस्ते मार्ग व रेल्वे मार्गांचा समावेश आहे. रेल्वे मार्गांच्या दृष्टिकोनातून बघितले तर पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड प्रमाणात वाहतुकीचा ताण येतो व त्यामुळे अनेक धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना वेळेवर फलाट उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
या सगळ्या समस्या वर म्हणजेच पुणे रेल्वे स्टेशनवरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आता तळेगाव- उरळी या नव्या मार्गाकरिता डीपीआर म्हणजेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
येत्या दोन महिन्याच्या आतमध्ये हा प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाला मंजुरीकरिता सादर केला जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे लवकरच पुण्याला आणखी एक नवीन रेल्वे मार्ग मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कसा असेल हा मार्ग?
नवीन प्रस्तावित असलेला तळेगाव- उरळी या नवीन मार्गाचा डीपीआर आता अंतिम टप्प्यात असून हा मार्ग चाकण आणि रांजणगाव या मार्गे असणार आहे. साधारणपणे 70 किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग असून त्यासाठी तब्बल 7000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या मार्गामुळे चाकण व रांजणगाव या औद्योगिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या भागांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी मिळणार असल्यामुळे या ठिकाणच्या उद्योगधंद्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकाचा ताण होईल कमी
सध्या जर आपण बघितले तर पुणे ते लोणावळा व पुणे ते दौंड रेल्वे मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त संख्येने रेल्वे गाड्या धावतात व त्यामुळे पुणे स्थानकावर प्रचंड प्रमाणात ताण येतो व अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.
या ठिकाणहून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळे अनेक गाड्यांना फलाट उपलब्ध होत नसल्याने दररोज सुमारे 72 प्रवासी गाड्यांना पुणे रेल्वे स्थानकाच्या दोन्ही होम सिग्नलवर क्रॉसिंगकरिता थांबावे लागते.
त्यासोबतच मुंबई कडून दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वे मालगाड्यांची संख्या जास्त असल्यामुळे देखील अनेक समस्या निर्माण होतात. या सगळ्या गर्दीमध्ये प्रवासी गाड्यांना ट्रॅक मिळत नाही व मालगाड्यांना देखील कित्येक तास थांबून राहावे लागते.
या सगळ्यामुळे रेल्वेचे खूप मोठे नुकसान होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे बोर्डाने तळेगाव ते उरळी दरम्यान नवीन रेल्वे मार्गीका टाकण्याचा विचार केला असून तिचा डीपीआर देखील आता अंतिम टप्प्यात आहे व दोन महिन्यात रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल.
तळेगाव ते उरळी या प्रस्तावित रेल्वे मार्गावरून जाणार फक्त मालगाड्या
महत्वाचे म्हणजे हा प्रस्तावित तळेगाव ते उरळी रेल्वेमार्ग फक्त मालगाड्यांसाठीच निश्चित करण्यात आला आहे व यावरून फक्त मालगाड्याच धावतील. नवीन रेल्वे मार्ग जेव्हा तयार होईल तेव्हा सर्व मालगाड्या तळेगाव-उरळी मार्गावरून धावतील
व त्यामुळे पुणे स्थानकावरचा जो काही मालगाड्यांमुळे ताण येतो तो कमी होण्यास मदत होईल. तसेच पुणे स्थानकावरून फक्त प्रवासी गाड्यांची वाहतूक होईल. या नियोजनामुळे प्रवासी गाड्या व मालगाड्यांना एकमेकांकरिता थांबावे लागणार नाही.
भूसंपादनासाठी लागतील चार हजार ते साडेचार हजार कोटी रुपये?
तळेगाव ते उरळी हा प्रस्तावित नवीन रेल्वेमार्ग खूप महत्त्वाचा असून याची लांबी 70 किलोमीटर आहे. परंतु या संपूर्ण 70 किलोमीटर भागातील जी काही जमीन आहे त्या ठिकाणाचे जमिनीचे भाव जास्त असल्यामुळे साहजिकच रेल्वे विभागाला आवश्यक जमीन संपादनाकरिता चार ते साडेचार हजार कोटींचा खर्च करावा लागणार अशी शक्यता आहे.