Railway News : भुसावळ–बडनेरा रेल्वेमार्गावरील भुसावळ विभागांतर्गत येणाऱ्या जलंब रेल्वेस्थानकावर पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. जलंब स्थानकावरील डाउन लूप लाइनचा विस्तार तसेच अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी यार्ड रिमॉडेलिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे.
या कामासाठी गुरुवारी दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा परिणाम काही प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे.

या ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक 20824 अजमेर–पुरी एक्स्प्रेस सुमारे 2 तास 30 मिनिटे उशिराने धावणार आहे. गाडी क्रमांक 22710 अंब अंदौरा–हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस सुमारे 2 तास नियमनात राहील.
तसेच गाडी क्रमांक 11040 गोंदिया–कोल्हापूर एक्स्प्रेस सुमारे 2 तास, तर गाडी क्रमांक 12751 हजूर साहिब नांदेड–जम्मू तवी एक्स्प्रेस सुमारे 1 तास 30 मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.
याशिवाय, प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम करणाऱ्या काही गाड्या पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत. 30 जानेवारी 2026 रोजी गाडी क्रमांक 61101 भुसावळ–बडनेरा मेमू, 61102 बडनेरा–भुसावळ मेमू, 11121 भुसावळ–वर्धा एक्स्प्रेस आणि 11122 वर्धा–भुसावळ एक्स्प्रेस रद्द राहतील.
तसेच गाडी क्रमांक 01211 बडनेरा–नाशिकरोड विशेष 30 जानेवारी 2026 रोजी रद्द करण्यात आली असून, गाडी क्रमांक 01212 नाशिकरोड–बडनेरा विशेष 29 जानेवारी 2026 रोजी रद्द राहणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या बदलांची आगाऊ नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. सदर ब्लॉक हा रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या कामामुळे भविष्यात गाड्यांची वेळेवर धाव, सुरक्षितता आणि सेवा गुणवत्तेत सुधारणा होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.













