Railway News : भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे सेवा असून दररोज सुमारे 13 हजार प्रवासी गाड्या देशभर धावतात. अनेक ट्रेन 150 किमी प्रतितासाहून अधिक वेगाने प्रवास करतात. मात्र याच भारतीय रेल्वेमध्ये एक अशी अनोखी ट्रेन आहे, जिने वेगाच्या स्पर्धेलाच नकार दिला आहे.
ही ट्रेन अवघ्या 46 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 तास घेते. म्हणजेच तिचा सरासरी वेग केवळ 9 किमी प्रतितास इतकाच आहे. ही भारतातील सर्वात संथ ट्रेन म्हणून ओळखली जाते – मेट्टुपालयम–ऊटी नीलगिरी पॅसेंजर, ज्याला नीलगिरी माउंटन रेल्वे किंवा ‘ऊटी टॉय ट्रेन’ असेही म्हणतात.

ही ऐतिहासिक ट्रेन तामिळनाडूतील मेट्टुपालयमपासून कुन्नूर मार्गे ऊटीपर्यंत धावते. नीलगिरीच्या डोंगररांगांमधून जाणारा हा प्रवास पर्यटकांसाठी एखाद्या स्वप्नवत अनुभवासारखा असतो. त्यामुळेच ही ट्रेन इतकी लोकप्रिय आहे की तिची तिकिटे अनेक दिवस आधीच बुक करावी लागतात.
या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव 1854 साली मांडण्यात आला होता. मात्र अत्यंत कठीण डोंगराळ भूभाग, तीव्र चढ-उतार आणि हवामानामुळे याचे प्रत्यक्ष काम 1891 मध्ये सुरू झाले आणि 1908 मध्ये पूर्ण झाले.
ही रेल्वे ‘रॅक अँड पिनियन’ प्रणालीवर चालते, ज्यामुळे ती तीव्र चढ सहज पार करू शकते. या अद्वितीय तांत्रिक वैशिष्ट्यांमुळे आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे नीलगिरी माउंटन रेल्वेला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा देण्यात आला आहे.
या प्रवासादरम्यान तब्बल 208 वळणे, 16 बोगदे आणि 250 हून अधिक पूल लागतात. आजूबाजूला पसरलेली हिरवीगार चहाची मळे, धुक्याची चादर, थंडगार वारा आणि शांत वातावरण प्रवाशांचे मन जिंकून घेतात.
ही ट्रेन जरी भारतातील सर्वात धीमी असली, तरी अनुभवाच्या बाबतीत ती सर्वात पुढे आहे. इथे वेग महत्त्वाचा नसून, प्रत्येक क्षण शांतपणे जगण्याचा आनंद महत्त्वाचा आहे.













