अजिंठा एक्स्प्रेस भुसावळवरून सुरू होणार का? उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची प्रतीक्षा कायम

Published on -

Railway News : मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्स्प्रेस (१७०६३/१७०६४) ही महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारी अत्यंत महत्त्वाची दैनिक रेल्वेगाडी असून गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून ती मनमाड स्थानकावरून धावत आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडमार्गे दक्षिण भारताशी थेट संपर्क साधणारी ही गाडी उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ही गाडी मनमाडऐवजी भुसावळ स्थानकावरून सुरू करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

सध्या अजिंठा एक्स्प्रेस मनमाड येथून सायंकाळी सुमारे सात वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता परतीचा प्रवास करून पुन्हा मनमाडलाच येते.

या दरम्यान जवळपास १२ तास गाडी मनमाड यार्डमध्ये थांबलेली असते. त्यामुळे हीच गाडी भुसावळपर्यंत वाढविण्यास वेळेची कोणतीही अडचण नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.

भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, पाचोरा तसेच परिसरातून सिकंदराबाद आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, या प्रवाशांसाठी आठवड्यातून केवळ तीनच दिवस थेट रेल्वेसेवा उपलब्ध आहे.

त्यातही अनेक गाड्यांना चाळीसगाव व पाचोरा या महत्त्वाच्या जंक्शनवर थांबा नसल्याने प्रवाशांना मनमाडपर्यंत जावे लागते. यामुळे वेळ, खर्च आणि गैरसोय वाढते.

अजिंठा एक्स्प्रेस भुसावळवरून सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील हजारो प्रवाशांना थेट लाभ होईल. शिवाय मनमाड स्थानकावरील प्रवासी आणि गाड्यांचा ताण कमी होण्याचीही शक्यता आहे.

यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे अधिकृत प्रस्ताव सादर करण्यात आला असून, दोन वर्षांपूर्वी मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक आर. के. यादव यांनीही भुसावळपर्यंत विस्ताराबाबत सकारात्मक संकेत दिले होते.

मात्र, सध्याच्या घडीला मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाच्या वाणिज्य विभागानुसार हा विस्तार शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. भुसावळ-मनमाड दरम्यान धावणाऱ्या इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तरीही प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून पाठपुरावा सुरू असून, रेल्वे प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe