Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्ये दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे करण्यात आले. या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपुर ते शिर्डी सध्या स्थितीला सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे.
दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या धोरणानुसार या महामार्गाचा दुसरा टप्पा म्हणजेच शिर्डी ते मुंबई हा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे.

यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून कामे जोरात सुरू आहेत. अशातच आता समृद्धी महामार्गाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाच्या विस्ताराबाबत मोठी माहिती दिली आहे. सध्या देशात मोठमोठाली महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. राज्यातही वेगवेगळी रस्ते विकासाची कामे राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता समृद्धी महामार्गाचा विस्तार देखील केला जाणार आहे.
समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत करण्याची योजना शासनाची आहे. यामुळे नागपूर ते गोंदिया हे अंतर मात्र एका तासात पार होणार आहे. साहजिकच यामुळे विदर्भात रस्ते मार्गाने कनेक्टिव्हिटी वाढणार आहे आणि यामुळे विकासाला मोठी चालना लाभणार आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग गडचिरोलीला देखील जाणार आहे.
गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा लॉजिस्टिक कॉरिडॉर तयार करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. गोंदिया मध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही घोषणा केली आहे. या लॉजिस्टिक कॉरिडॉरमुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं देखील त्यांनी नमूद केल आहे.
निश्चित समृद्धी महामार्गामुळे विदर्भाला एकात्मिक विकासासाठी वाव लाभला आहे. यामुळे कृषी, पर्यटन, उद्योग अशा तीनही क्षेत्रात विदर्भाला अभूतपूर्व अशी प्रगती साध्य करता येणार आहे. दरम्यान आता या लॉजिस्टिक कॉरिडॉरमुळे विदर्भाच्या विकासाला सुनिश्चितता मिळणार आहे. निश्चितच देवेंद्र फडणवीस यांची ही घोषणा विदर्भवासियांसाठी फायद्याची ठरणारी आहे.