Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला अन सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली ती म्हणजे अमोल खताळ यांच्या विजयाची. काल अर्थातच 23 नोव्हेंबरला अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एक मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. खरे तर संगमनेर हा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला होता.
ते तब्बल आठ वेळा या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत. महत्वाचे म्हणजे बाळासाहेब थोरात CM पदाचे कॅन्डीडेट सुद्धा होते. यामुळे बाळासाहेब थोरात हे यंदाच्या निवडणुकीत सहज विजयी होतील असा अंदाज होता. पण झालं उलट, अमोल खताळ हे येथून विजयी झालेत अन त्यांनी थोरात यांना 10 हजाराहून अधिक मतांनी चितपट केले.
या निवडणुकीत महायुतीची जी लाट आली त्या लाटेत बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. यामुळे या पराभवाची अन खताळ यांच्या विजयाची सध्या संपूर्ण राज्यभर चर्चा आहे. थोरात यांच्या खेम्यात साहजिकचं निकालानंतर अस्वस्थता पसरली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पण शिंदे गटाचे अमोल खताळ अन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यातचं येथे प्रमुख लढत होती.
या सरळ लढतीत खताळ अगदी पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. शेवटच्या फेरी अखेर खताळ यांना 1 लाख 12 हजार 386 आणि बाळासाहेब थोरात यांना एक लाख एक हजार 826 मते मिळालीत. अर्थातच खताळ यांनी 10,560 मतांनी थोरातांचा बालेकिल्ला ताब्यात घेतला. खरे तर खताळ हे विखे पाटील यांचे निकटवर्तीय नेते. त्यांच्या (अमोल खताळ) राजकीय कारकीर्दीची सुरुवात सुद्धा काँग्रेसमधून झालीये.
मात्र पुढे त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस, मग भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) असा झाला. अमोल खताळ यांची कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. ते अगदीच सामान्य कार्यकर्ते आहेत. विखे पाटील यांच्याशी जवळचे संबंध हीच काय त्यांची राजकीय पार्श्वभूमी असं आपण म्हणू शकतो. खताळ या आडनावामुळे अमोल खताळ यांचा संबंध महाराष्ट्राचे माजी पाटबंधारे मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्याशी जोडला जातो, पण अमोल खताळ यांचा माजी मंत्री बी जे खताळ यांच्याशी कुठलाचं संबंध नाही.
आपल्या राजकारणाच्या सुरुवातीला खताळ हे तालुका काँग्रेसचे पदाधिकारी होते अन त्यांनी स्वतः काही काळ बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते म्हणून काम सुद्धा पाहिले आहे. म्हणजे थोरातांच्या जुन्या कार्यकर्त्यांनीच त्यांना पराभवाची धूळ चारली आहे. काँग्रेसला राजीनामा दिल्यानंतर अमोल खताळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. तेथे त्यांचे संगमनेरमधील ठेकेदारीच्या मुद्द्यावर मतभेद झाले. बाळासाहेब थोरात सामान्यांकडे दुर्लक्ष करून ठराविक ठेकेदारांना प्राधान्य देतात, असा अमोल खताळ यांचा आक्षेप होता.
पुढे त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत राधाकृष्ण विखे पाटील यांचं काम सुरू केलं. विखेंनी अमोल खताळ यांना संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद सुद्धा दिलं. त्या वर्षभरात त्यांनी सामान्य नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ मिळवून देत प्रभावी काम केलं आणि त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची फळी उभी केली. दरम्यान याचाही फायदा या विधानसभा निवडणुकीत खताळ यांना झाला आहे. पण, खताळ यांच्या विजयाची नेमकी कारणे कोणती? याचाचं आढावा आज आपण घेणार आहोत.
खताळ यांच्या विजयाची कारणे?
1) खताळ यांच्या विजयात विखे पाटील यांची भूमिका मोलाची राहिली. लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. निलेश लंके हे येथून विजयी झालेत. त्यांच्या विजयात बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. दरम्यान याचाच बदला घेण्यासाठी अमोल खताळ यांना विखे-पाटील कुटुंबीयांनी बळ दिले.
2) खताळ यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष पद आपल्याकडे असताना मतदार संघात मोठ्या प्रमाणात कामे केलीत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात, वाड्यावस्त्यांवर खताळ पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे २८ हजारांहून अधिक अर्ज भरलेत. यामुळे खताळ यांचा जनसंपर्क संगमनेरात मोठ्या प्रमाणात वाढला अन हे सुद्धा त्यांच्या विजयाचे महत्त्वाचे कारण ठरले.
3) संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना खताळ यांनी अनेकांना लाभ मिळवून तर दिलाचं शिवाय महायुती घटक पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही प्रामाणिक साथ दिली.
4) सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खताळ यांच्या उमेदवारीला महायुतीमध्ये कोणाचाच विरोध नव्हता. सुजय विखे पाटील येथून निवडणूक लढवण्यात उत्सुक होते मात्र त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. दरम्यान सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची संपूर्ण यंत्रणा संगमनेरात ऍक्टिव्ह राहिली. याच कारणांमुळे अमोल खताळ हे या निवडणुकीत जायंट किलर ठरलेत.