संपूर्ण भारतात जर आपण बघितले तर प्रवास जलद गतीने होण्याकरिता महत्वाची जी काही राज्य आणि शहरे आहेत त्यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या तसेच वाहतूक व दळणवळणाच्या सोयी सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेली असून त्यातील बरीच कामे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत तर काही प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत.
त्या अनुषंगाने जर आपण महाराष्ट्रात बघितले तर महाराष्ट्रात देखील अनेक महामार्गांची कामे प्रस्थावित आहेत व काही महामार्गांचे कामे सुरू असून अशा प्रकल्पामुळे प्रवास तर जलद होणार आहेच परंतु अनेक ठिकाणी किंवा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी प्रवास करताना जो काही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो तो देखील आता कमी होणार आहे.
या दृष्टिकोनातून काही प्रकल्पांची आखणी करण्यात आलेली असून त्यातील शिवडी-न्हावाशेवा अटल सेतुला थेट आता पुणे ते सातारा व सोलापूरला जोडणारा द्रूतगती महामार्ग तयार केला जाणार असून या प्रकल्पामुळे येणाऱ्या काळात मुंबई ते पुणे प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
कमी वेळेत आता गाठता येईल पुणे तसेच सोलापूर आणि सातारा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई ते पुणे प्रवास करताना नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो यामध्ये वाहतूक कोंडीचा सामना हा तर पाचवीलाच पुजलेला आहे. कित्येक दिवसापासून प्रवाशांची याबाबत खूप तक्रारी असून आता मात्र या तक्रारी दूर होण्यास मदत होणार आहे.
कारण पुणे ते मुंबई द्रूतगती महामार्गावर जी काही वाहतूक कोंडी होते ती सोडवण्याकरिता आता शिवडी-न्हावाशेवा अटल सेतुला आता थेट पुणे- आणि सोलापूरला जोडणारा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार असून या प्रकल्पासाठी 17000 कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. जेव्हा हा प्रकल्प पूर्णत्वास येईल तेव्हा मुंबई ते पुणे प्रवास आणखीन वेगवान होण्यास मदत होणार आहे.
मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला आता पुणे- सातारा- सोलापूरला जोडण्यात येणार आहे व या नव्या पर्यायी मार्गामुळे प्रवासात सव्वा ते दीड तासांची बचत देखील होणार आहे.
एवढेच नाही तर अटल सेतू आणि जेएनपीटी देखील थेट पुणे-सातारा- सोलापूरला जोडण्यात येणार आहे. त्याचवेळी पुणे ते शिवारे जंक्शन असा 130 किलोमीटर लांबीचा आणि आठ लेनचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतला असून त्याकरिता सतरा हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.
मुंबई–पुणे–मुंबई प्रवाशांच्या सेवेत खुला होत आहे आणखी एक पूल
मुंबई पुणे प्रवासासाठी ठाणे खाडी पूल तीन प्रकल्पातील दक्षिणेकडील म्हणजेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम आता पूर्ण झाले आहे. मुंबईहून पुण्याकडे जाण्याकरिता खाडी पूल दोन सह नवीन ठाणे खाडी पूल तीनचा पर्याय देखील आता उपलब्ध होणार असून लवकरच ही मार्गिका देखील आता प्रवाशांच्यासाठी खुली करण्यात येणार आहे.
या प्रकल्पातील मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम आता जवळपास पूर्ण झालेले आहे. परंतु पुणे आणि मुंबईचा प्रवास जर वाहतूक कोंडी न होता करायचा असेल तर प्रवाशांना अजून तरी प्रतीक्षा करणे गरजेचे आहे.