Scheme For Girl:- राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक लाभाच्या योजना राबवल्या जात असून त्याचा फायदा घेणे खूप गरजेचे आहे. आर्थिक दुर्बल उत्पन्न गटातील घटक तसेच कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून देखील अनेक योजना असून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
शैक्षणिक दृष्टिकोनातून ग्रामीण भागाचा विचार केला तर अनेक गावांमध्ये माध्यमिक शाळा नसल्यामुळे बऱ्याचदा बाहेरगावी शिक्षणाकरिता जायला लागते. तसेच मुलींच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळावे याकरिता देखील शासनाच्या योजना असून याच योजनेबद्दल आपण या लेखात माहिती बघणार आहोत.
इयत्ता पाचवी ते बारावीतील मुलींना मिळतील सायकली
ग्रामीण भागामध्ये अजून देखील अनेक पायाभूत सुविधांची वाणवा असल्यामुळे बऱ्याच प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यातीलच एक महत्त्वाची समस्या म्हणजे प्रत्येकच गावामध्ये बस येत नसते किंवा बसची सोय नसते. जरी बस असली तरी शाळेचा वेळ आणि बसचा वेळ यामध्ये खूप मोठी तफावत असते.
त्यामुळे बऱ्याचदा मुलींना शाळा किंवा महाविद्यालयामध्ये जाणे जीकीरीचे ठरते. या अनुषंगाने मुलींना जर सायकली दिल्या तर त्यांची वेळेची बचत पण होईल आणि शाळेत मुलींचे होणारी गळतीचे प्रमाण देखील थांबवता येईल. याच दृष्टिकोनातून अनुसूचित जातीतील मुलींना त्यांनी जात प्रमाणपत्र दिल्यानंतर या योजनेचा लाभ दिला जातो. पाचवी ते बारावीतील मुलींना सायकली करिता लाभार्थी निवडीचे निकष ठरवण्यात आलेली असून ते पुढील प्रमाणे आहेत….
1- सर्वात प्रथम म्हणजे लाभार्थी मुलगी ही ग्रामीण भागातील असावी.
2- इयत्ता पाचवी ते बारावी दरम्यान कुठल्या इयत्तेत शिकत असावी.
3- लाभार्थ्याचे घर आणि शाळा यातील अंतर कमीत कमी एक किलोमीटर पेक्षा जास्त किंवा दोन किलोमीटर पर्यंत असावे.
हे सर्वसाधारण निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थी मुलींना सायकलीचा लाभ दिला जातो.
सातवी ते बारावीच्या मुलींना मिळेल संगणक प्रशिक्षण
यासोबतच ग्रामीण भागातील सातवी ते बारावी पर्यंतच्या ज्या काही मुली आहेत त्यांना कॉम्प्युटरचे म्हणजेच संगणकाचे ज्ञान मिळावे याकरिता मुलींमधील कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून संगणक प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे व त्यातून त्यांना नोकरी किंवा व्यवसायाची संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. या संगणक प्रशिक्षणाकरिता देखील लाभार्थी निवडीचे निकष असून ते पुढील प्रमाणे…..
1- संबंधित लाभार्थी मुलगी ही ग्रामीण भागातील रहिवासी असावी.
2- संगणक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
3- संबंधित लाभार्थी ही दारिद्र्यरेषा कुटुंबातील असावी.
4- संबंधित लाभार्थी मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत असणे गरजेचे आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना
ही देखील मुलींसाठी खूप महत्त्वाची योजना असून मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तसेच खात्री, मुलींचा जन्मदर वाढवणे तसेच लिंग निवडीस प्रतिबंध करणे व मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे इत्यादी दृष्टिकोनातून माझी कन्या भाग्यश्री योजना खूप महत्त्वाची आहे.
या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबामध्ये एक किंवा दोन मुली आहेत अशा मुलींच्या नावे वैयक्तिक लाभातून पन्नास हजार किंवा 25 हजार रुपयांची ठेव ठेवली जाते. या योजनेचे अर्ज तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रामध्ये मिळू शकतात व मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण व ती अविवाहित असणे गरजेचे आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी च्या अटी व शर्ती
1- एक ऑगस्ट 2017 नंतरची पहिली आणि दुसरी अशा दोन्ही मुलींना लाभ मिळेल.
2- एक ऑगस्ट 2017 नंतरची एकच मुलगी आहे व माता किंवा पित्याने दोन वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून प्रमाणपत्र व प्रस्ताव सादर केला असेल तर अशा मुलीला पन्नास हजार रुपयांची मुदत ठेव प्रमाणपत्र देय राहील.
3- एक ऑगस्ट 2017 नंतर दोन मुली आहेत व एक वर्षाच्या आत माता व पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून त्यासंबंधीचे प्रमाणपत्र व प्रस्ताव सादर केला असेल तर प्रत्येक मुलीच्या नावे प्रत्येकी 25 हजार रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात येईल.
4- तसेच प्रथम जुळ्या मुली असतील व त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर दोन्ही मुलींना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा लाभ देण्यात येईल.
5- माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थी कुटुंबाने आठ लाख पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे.
अशाप्रकारे या मुलींसाठीच्या महत्त्वपूर्ण योजना असून त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे.