Snake Bite:-सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे चिखल किंवा पाणी तुंबलेले असते व या कालावधीमध्ये सापांचे प्रमाण देखील बऱ्याचदा वाढते व सर्पदंशाच्या प्रकरणांमध्ये देखील या दिवसात वाढ होताना आपल्याला दिसून येते. सापाच्या बाबतीत आपण विचार केला तर साप समोर दिसल्याबरोबर आपल्याला पळता भुई थोडी होते.
तसे पाहायला गेले तर सापाला आपण जितके घाबरतो तितकाच साप आपल्याला घाबरत असतो ही वस्तुस्थिती आहे. आपण देखील तेवढ्याच काळजीने सापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो परंतु बऱ्याचदा दुर्दैवाने सर्पदंशाची घटना घडते व अशावेळी मनात खूप मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडतो.

या व्यक्तीला साप चावलेला असतो तो तर घाबरतोस परंतु इतर व्यक्ती देखील घाबरतात व काय करावे हे सुचत नाही. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये साप चावल्यावर कोणती लक्षणे दिसतात व कोणत्या प्राथमिक उपाययोजना कराव्यात तसेच कोणत्या उपाययोजना करू नयेत? याबद्दलची माहिती बघणार आहोत.
साप चावल्यावर दिसणारी लक्षणे
बरेचदा साप चावल्यानंतर आपल्याला कळते किंवा आपल्यासमोर किंवा आपण साप चावताना पाहतो परंतु बऱ्याचदा साप आपल्याला चावून जातो परंतु आपल्याला कळत नाही. लक्षणांवरून साप चावला आहे की नाही हे आपण ओळखू शकतो. जर साप चावल्यानंतर च्या लक्षणांचा विचार केला तर यामध्ये साप ज्या ठिकाणी चावलेला असतो त्या ठिकाणी जखम होते.
ज्या ठिकाणी साप चावला आहे अशा ठिकाणी लालसर पणा तसेच सुज येऊन वेदना होतात तसेच उलट्या व मळमळ व्हायला लागते. डोळ्यांना देखील व्यवस्थित दिसत नाही तसे अंगाला दरदरून घाम सुटतो व आकडी यायला लागते. श्वास घ्यायला देखील त्रास व्हायला लागतो तसेच अन्न गिळता येत नाही, पोटात दुखायला लागते तसेच ताप देखील येतो. हात पायांना मुंग्या यायला लागतात किंवा हात पायांमध्ये बधीरता जाणवते.
साप चावल्यावर नेमके काय करावे?
साप विषारी होता की बिनविषारी होता हे जाणून घेण्यापेक्षा विषारी साप समजूनच प्राथमिक उपाययोजना करणे गरजेचे असते. यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि अगोदर करता येण्यासारखा प्राथमिक उपाय म्हणजे साप चावलेल्या व्यक्तीला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हाच होय. त्वरित रुग्णवाहिका बोलून घ्यावी किंवा इतर वाहनाने व्यक्तीला दवाखान्यात लवकरात लवकर नेण्याचा प्रयत्न करावा. परंतु तरी देखील प्राथमिक उपाय म्हणून….
1- हॉस्पिटलमध्ये जायला वेळ लागत असेल किंवा रुग्णवाहिका यायला वेळ लागत असेल तोपर्यंत साप चावलेल्या व्यक्तीला शांत करावे व त्याला मोठ्या प्रमाणावर धीर द्यावा तसेच त्याला आडवे झोपवावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साप चावलेल्या व्यक्तीला जास्त हालचाल करू देऊ नये. हालचाल जर जास्त प्रमाणात केली तर रक्तप्रवाहातून शरीरात विष लवकरात लवकर पसरण्याचा संभव असतो.
तसेच जंतुनाशक औषध जवळ असेल तर साप चावल्याच्या ठिकाणी लावावे किंवा साबणाच्या पाण्याने साप चावलेल्या ठिकाणी व्यवस्थित स्वच्छ धुऊन घ्यावे. ज्या ठिकाणी साप चावला आहे त्या जागेच्या वरील बाजूस दोरीने आवळपट्टी बांधावी.
यामुळे सर्व शरीरामध्ये विष पसरण्यापासून अटकाव होतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारचे पट्टी बांधताना ती जास्त घट्ट बांधू नये. आवळ पट्टी बांधल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी सोडावी व 15 सेकंद झाल्यानंतर पुन्हा बांधावी व लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करावा.
साप चावल्यावर हे मुळीच करू नये
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साप चावला तर अगोदर घाबरू नये. तसेच साप शोधण्यामध्ये किंवा साप मारण्याला अजिबात वेळ न घालवता सर्पदंश झालेल्या व्यक्तीला लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा कशा मिळतील याचा विचार करावा तसेच साप चावलेल्या व्यक्तीला चालत दवाखान्यांमध्ये न नेता रुग्णवाहिका किंवा जवळच्या एखाद्या वाहनातून लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जावे.
ज्या ठिकाणी सापाने चावा घेतला आहे अशा ठिकाणी ब्लेडने कापू नये किंवा चिरा देऊ नये. यामुळे जास्तीचा रक्तस्राव होऊ शकतो व रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. तसेच ज्या ठिकाणी साप चावला आहे त्या ठिकाणी झालेली जखम चोळू नये तसेच साप चावल्यानंतर कोणतेही घरगुती उपाय करीत बसू नये.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साप चावलेल्या ठिकाणचे रक्त तोंडाने शोषणाचा प्रयत्न करू नये. जखमेवर बर्फ किंवा कोल्ड कम्प्रेस यापैकी काहीही लावू नये. तसंच कोणत्याही प्रकारचे झाडपाला जखमेवर लावू नये तसेच चावलेल्या ठिकाणी लोखंड वगैरे काहीही गरम करून चटके वगैरे लावण्याचा प्रकार करत बसू नये.
तसेच ज्या व्यक्तीला साप चावला आहे अशा व्यक्तीला चहा किंवा कॉफी प्यायला देऊ नये. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सापाचे विष मांत्रिका कडे जाऊन उतरते हा एक मोठा गैरसमज असल्यामुळे साप चावलेल्या व्यक्तीला मांत्रिका कडे घेऊन जाऊ नये व वेळ न घालवता लवकरात लवकर दवाखान्यात जावे.