Snake Information:- साप म्हटले म्हणजे आपल्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. सापाबद्दल समाज मनामध्ये अनेक प्रकारचे श्रद्धा आणि अंधश्रद्धा असून साप हे विषारी असतात असे देखील म्हटले जाते. परंतु तसे पाहायला गेले तर यापूर्वी पृथ्वीतलावर जेवढ्या सापांच्या प्रजाती आहेत त्यापैकी बोटावर मोजण्या इतकेच प्रजाती या विषारी आहेत. परंतु त्यांची ओळख कशा पद्धतीने करावी हे आपल्याला माहित नसल्यामुळे गल्लत होते.
अनेक प्रकारचे प्रश्न सापाविषयी आपल्या मनात येतात. सापाबद्दल काही बाबी पाहिल्या तर आपल्या मनामध्ये सहज येते की साप घर बांधतो का? तर याचे उत्तर होय असे आहे. यामध्ये कोब्रा जातीच्या सापाची मादी अंडी घालण्या अगोदर झाडांची पाने,वाळलेले गवत अशा कुजणाऱ्या पदार्थ पासून ढीग तयार करते. साधारणपणे तीन ते चार फूट रुंद आणि एक ते तीन फूट उंच अशा पद्धतीचे घरटे ती उभारते.
या पद्धतीच्या घरामध्ये तयार झालेली उष्णता अंडी उबवण्यासाठी कामी येते. साधारणपणे 20 ते 30 अंडी ही मादी एका वेळेस देते. विशेष म्हणजे अंडी द्यायच्या अगोदर आणि अंडी दिल्यानंतर कोब्राची मादी खूप आक्रमक असते. अंड्यातून बाहेर आलेल्या पिलांची लांबी 40 ते 45 सेंटीमीटर असते.
किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांबीचा विषारी साप आहे. साधारणपणे जास्तीत जास्त 18 फुटापर्यंत त्याची लांबी असण्याची शक्यता असते. अशी अनेक प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला सापाबद्दल सांगता येतील. परंतु या लेखामध्ये आपण सापांचे विषारी जाती कोणत्या व त्या कशा ओळखाव्या याबद्दल माहिती घेणार आहोत.
सापांच्या विषारी जाती कोणत्या व त्या कशा ओळखाव्या?
1- नाग– नाग काळा किंवा तपकिरी रंगाचा असतो व त्याच्या अंगावर लहान खवले असतात. संकटाच्या कालावधीत समोरच्या प्राण्याला घाबरवण्याकरिता फणा काढतो. फणा काढल्यानंतर या सापाच्या फणाच्या पाठीमागे साधारणपणे दहाचा आकडा किंवा झिरोचा आकडा पाहायला मिळतो. हा साप अत्यंत विषारी असतो.
या सापाचे विष व्यक्तीच्या मेंदू आणि हृदयावर परिणाम करते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू एक ते दीड तासामध्ये होऊ शकतो. जर त्याला वेळेवर उपचार मिळाले नाही तर. नागाच्या विषापासूनच अँटी स्नेक विनोम हे प्रतिविष तयार केले जाते. त्यामुळे विषारी साप चावलेल्या व्यक्तीचा जीव वाचण्यास मदत होते.
2- किंग कोब्रा– यामध्ये दुसरा विषारी साप म्हणजेच किंग कोब्रा व यालाच आपण नागराज असे देखील म्हणतो. हा साप गडद हिरवट किंवा राखाडी पिवळसर रंगाचा असतो. या जातीचा सापाने चावा घेतल्यानंतर वैद्यकीय उपचार मिळाले नाही तर अर्ध्या तासात व्यक्तीचा जीव जातो. किंग कोब्रा जातीच्या सापाच्या मादीचे वैशिष्ट्य असते की ही अंडी घालताना घरटे तयार करते. वाळलेली पाने, कुजून जाणारा कचरा याच्यापासून स्वतःच्या शेपटीच्या मदतीने ही घरटे तयार करते.
या घरट्यामध्ये ती अंडी घालते व या घरट्यामध्ये ती अत्यंत आक्रमक असते. या सापाचे विष न्यूरोटॉक्सिन किंवा कार्डिओटॉक्सिन प्रकारचे आहे. म्हणजेच या सापाच्या विषाचा मेंदू आणि हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे चक्कर येणे, तीव्र वेदना होणे तसेच पॅरॅलिसिस होने किंवा हृदयविकाराचा झटका येणे इत्यादी कारणांमुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
3- फुरसे–हा साप महाराष्ट्रातील कोकणात खास करून रत्नागिरी जिल्ह्यात आढळून येतो. या सापाला ग्रामीण भाषेमध्ये फरुड असे देखील म्हटले जाते. भारतामध्ये साप चावल्याने जे मृत्यू होतात त्यापैकी सर्वात जास्त मृत्यू फुरसे जातीचा साप चावल्याने होतात. तपकिरी तसेच फिकट पिवळसर किंवा वाळू सारखा दिसणारा हा साप असून त्याला स्केल्ड वायपर असे देखील म्हटले जाते.
त्याच्या अंगावर पांढऱ्या नागमोडी रेषा असतात आणि पोटाचा रंग पांढरा असतो. तसेच काळे व पांढरे ठिपके देखील दिसतात. तसेच या जातीच्या सापाचे शेपूट हे लहान आकाराचे असते. या सापाच्या विषाचा परिणाम हा शरीराच्या रक्ताभिसरण संस्थेवर होतो. या सापाच्या विषामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया कमी होते व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो. रक्तस्राव जास्त प्रमाणात झाल्यामुळे रक्तदाब कमी होतो व किडनी फेल होते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे या सापाला अत्यंत घातक असे म्हटले जाते.
3- मण्यार– काळसर निळ्या रंगाचा, अंगावर पांढरे खवले असणारा व ही खवले त्याच्या शेपटीच्या भागाकडे जास्त असतात व माने कडे कमी होत जातात. हा साप निशाचर म्हणजे रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात बाहेर पडतो. हा साप खूप भयानक असून हा तोंडाच्या माध्यमातून विष भक्षावर फेकतो आणि भक्षावर कब्जा मिळवतो व त्याला खाऊन टाकतो. या जातीच्या सापाचे विष नाग जातीच्या सापापेक्षा 15 पटीने जास्त विषारी आहे. या जातीच्या सापाने चावा घेतला तर रुग्णाला तीव्र स्वरूपात तहान लागणे, जास्त प्रमाणात पोटात दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे इत्यादी त्रास व्हायला लागतो.
4- घोणस– महाराष्ट्रातील चार विषारी सापांपैकी हा एक असून याला रसेल वायपर असे देखील म्हटले जाते. या सापाचा रंग करडा असतो आणि अंगावर साखळी सारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात. तसेच याची महत्त्वाची खासियत म्हणजे हा कुकरच्या शिट्टी प्रमाणे आवाज करतो. या सापाचे विष रक्तभिसरण संस्थेवर परिणाम करते. यामुळे रक्त गोठण्याची क्षमता कमी होते व प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होतो. शरीराच्या अंतर्गत भागात तसेच नाक, कान,डोळे, लघवी इत्यादी माध्यमातून रक्तस्राव होतो व रक्त मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे रुग्णाच्या शरीरातील रक्तदाब कमी होतो व रुग्णाचा मृत्यू होतो.