स्टार एअरवेजला हिरवा कंदील ! सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा

Published on -

सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुंबईसारख्या मोठ्या शहराशी थेट जोडणारी विमानसेवा आता सोलापुरातूनही सुरू होणार आहे. स्टार एअरवेज या खासगी विमान कंपनीला या सेवेची अधिकृत परवानगी मिळाली असून, येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सोलापूर-पुणे-मुंबई असा प्रवास हवेतून करता येणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर सोलापूरच्या प्रगतीच्या दृष्टीने हा एक मोठा टप्पा ठरेल.

याआधीच ९ जून रोजी सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू झाली आणि त्यानंतर मुंबई व पुण्यासारख्या शहरांसाठीही विमानसेवा सुरू होण्याची मागणी लोकांमध्ये जोर धरू लागली होती. आता या मागणीला अधिकृत रूप मिळालं आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि DGCA ने स्टार एअरवेजच्या ‘एम्ब्रायर-१७५’ या प्रकारच्या विमानाला सोलापूर विमानतळावरून उड्डाणाची परवानगी दिली आहे. आणि ह्या विमानात ७८ प्रवासी प्रवास करू शकतात

सुरुवातीला या मार्गासाठी ‘एटीआर-४२’ प्रकारच्या विमानाची योजना होती, मात्र तांत्रिक मर्यादांमुळे ती अडचणीत आली. कंपनीकडे ‘थ्री-सी’ श्रेणीचे विमान होते, ज्यामुळे सेवा लांबणीवर पडली होती.

पण स्टार एअरवेजने हटून न बसता ‘एम्ब्रायर-१७५’ प्रकारचे विमान सादर करून नव्याने परवानगी मागितली – आणि ती मिळालीही. ही गोष्ट सोलापुरासाठी केवळ विमानसेवा सुरू होण्याइतकीच नाही, तर आशावाद आणि चिकाटीचंही प्रतीक आहे.

सोलापुरातून आता केवळ मुंबईच नाही, तर भविष्यात तिरुपती, बेंगळुरूसारख्या ठिकाणीही विमानसेवा सुरू व्हावी, अशीही लोकांची इच्छा आहे. विशेषतः तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा खूप उपयुक्त ठरू शकते. बेंगळुरूसारख्या आयटी हबशी सोलापूर जोडले गेले, तर उद्योग, शिक्षण आणि नोकरीच्या संधीही वाढतील.

सध्या दिल्लीसाठी सोलापुरातून थेट रेल्वे आहे, पण तीही मर्यादित आहे. आठवड्यातून एकच रेल्वे, किंवा गोवा मार्गे विमान हे फारसे सोयीचे नाही. जर सोलापूर ते दिल्ली थेट विमानसेवा सुरू झाली, तर संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटक सीमेलगतच्या भागांनाही जबरदस्त फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!