Soybean Farming : सोयाबीन हे मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उत्पादित होणार खरीप हंगामातील एक मुख्य नगदी आणि तेलबिया पीक आहे. वाशिम जिल्ह्यात देखील सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यंदा वाशिम जिल्ह्यात तीन लाख 4 हजार 80 हेक्टर शेत जमिनीवर सोयाबीन पीक लागवड होणार असा अंदाज आहे.
दरम्यान यावर्षी सोयाबीन पीक पेरणी करताना जर शेतकऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेतली तर सोयाबीन उत्पादकता वाढवता येणे शक्य होणार आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना तसा सल्ला देखील दिला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी पाणथळ, नदी-नाले काठावरील जमिनीत सोयाबीन लागवड सरी वरंबा किंवा मग बीबीएफ टोकण यंत्राच्या साह्याने केली तर त्यांना अधिकचे उत्पादन मिळवता येणार आहे.
वास्तविक सोयाबीन पिकाच्या पीक उत्पादनात घट होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये पहिले आणि प्रमुख कारण म्हणजे शेतकरी बांधव पाणथळ, नदी-नाले काठावरील जमिनीत पारंपारिक पद्धतीने सोयाबीन लागवड करतात. यामुळे सोयाबीन पिकात पावसाळ्याच्या काळात पाणी साचते आणि पीक पूर्णपणे बरबाद होते.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; तूर पिकाला ‘या’ खतांची मात्रा द्या, हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवा
यामुळे या अशा जमिनीत शेतकऱ्यांनी पेरणी करताना सरीवरंबावर टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड किंवा बीबीएफ टोकण यंत्राच्या साह्याने पेरणी केली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी गेल्या हंगामामध्ये सरीवरंब्यावर टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड केली होती अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्यावर आणि पानथळ जमीन असल्यावर देखील चांगले उत्पादन मिळवता आले आहे.
म्हणून यंदा शेतकऱ्यांनी पाणथळ जमीन असेल, नदीकाठाची जमीन असेल, जमिनीत पावसाळ्याच्या काळात पाणी साचत असेल, खोलगट जमीन असेल तर अशा जमिनीत सरी वरंबा तयार करून टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड करावी असा सल्ला देण्यात आला आहे. जाणकार लोक सांगतात की, सरीवरंबा पद्धत किंवा बीबीएफ यंत्राद्वारे सोयाबीनची लागवड केल्यास एकरी 16 ते 22 किलो बियाणे लागते.
पारंपारिक पद्धतीने यापेक्षा जवळपास 40 ते 50 टक्के अधिक बियाणे मात्र शेतकऱ्यांना लागू शकते. याचाच अर्थ या आधुनिक पद्धतीने लागवड केल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बियाण्याच्या खर्चात मोठी बचत होणार आहे तसेच उत्पादनात देखील मोठी वाढ होणार आहे. याव्यतिरिक्त देखील शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक पेरणी करताना काही बाबींची काळजी घेतली पाहिजे.
हे पण वाचा :- पंजाब डख : अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ‘या’ दिवशी मुसळधार पाऊस पडणार ! मान्सून आगमन लांबणार ? पहा….
ही काळजी घ्या
सोयाबीनचे पीक हलक्या जमिनीत येत नाही, यामुळे हलक्या जमिनीत सोयाबीन पीक घेणे टाळावे. सोयाबीन हे भारी जमिनीतील आणि मध्यम जमिनीतील पीक आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मध्यम ते भारी जमिनीत सोयाबीन लागवड केली पाहिजे.
तसेच सोयाबीनच्या जातीची निवड जमिनीच्या मगदूराप्रमाणे केली पाहिजे. म्हणजेच तुमची जमीन भारी आहे की मध्यम आहे यानुसार सोयाबीनच्या वाणाची निवड करणे जरुरीचे आहे.
याशिवाय, जर शेतकरी बांधव घरगुती बियाणे वापरत असतील तर बियाण्याची उगवण क्षमता आधी तपासून पाहणे आवश्यक आहे. सोबतच प्रतवारी करून बियाण्याची निवड करणे जरुरीचे आहे.
सोयाबीनची पेरणी करताना बीजप्रक्रिया करणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशकांचा आणि बुरशीनाशकाचा वापर करावा लागणार आहे.
तसेच सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीनची पेरणी पाच सेंटीमीटर पेक्षा खोलवर करू नये. म्हणजेच पेरणी पाच सेंटीमीटरपेक्षा कमी खोलीतच केली पाहिजे.
अनेकदा असं पाहायला मिळतं की शेतकरी बांधव तज्ञांचा सल्ला न घेता रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर करतात. शिफारशीत मात्रांमध्ये रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर करत नाहीत. परिणामी पीक उत्पादनात घट होते यामुळे रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर शिफारशीप्रमाणेच केला पाहिजे.
याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांनी रोपांची हेक्टरी संख्या योग्य प्रमाणात ठेवली पाहिजे. म्हणजेच पेरणी करताना अधिक दाट किंवा अधिक पातळ, विरळ पेरणी करू नये.
अनेक शेतकरी बहुपीक पेरणी यंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी करतात जे की चुकीचे आहे. सोयाबीनची पेरणी ही बीबीएफ यंत्राद्वारेच केली पाहिजे. तसेच सरी वरंबा तयार करून त्यावर टोकन पद्धतीनेच सोयाबीनची पेरणी केली पाहिजे.