Soybean Rate : जवळपास तीन ते साडेतीन वर्षांच्या दीर्घ मंदीनंतर राज्यातील सोयाबीनच्या बाजारभावांनी अखेर मोठी झेप घेतली आहे. अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर थेट ५,१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला असून, येत्या काही दिवसांत हा दर ५,५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जात आहे.
दीर्घकाळ कमी दरांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही भाववाढ दिलासादायक वाटत असली, तरी प्रत्यक्षात या तेजीचा लाभ बहुतांश शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे चित्र आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जवळपास ७५ टक्के शेतकऱ्यांनी आपला सोयाबीनचा माल यापूर्वीच ४,६०० ते ४,७०० रुपये प्रतिक्विंटल या कमी दरात विकला आहे. उत्पादन खर्चात सातत्याने झालेली वाढ, कर्जाचा वाढता ताण आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे अनेक शेतकऱ्यांना माल साठवून ठेवणे शक्य झाले नाही.
परिणामी, दर कमी असतानाच माल विकण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. आता दर वाढले असले, तरी हातात विक्रीसाठी साठा नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, गेल्या १५ दिवसांत सोयाबीनच्या दरात लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे. अवघ्या पंधरा दिवसांत दरात सुमारे ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली असून, यामुळे बाजारात पुन्हा एकदा सोयाबीन चर्चेचा विषय ठरले आहे.
यंदा अपेक्षेपेक्षा उत्पादनात घट झाल्याने बाजारात मालाची आवक कमी आहे. दुसरीकडे, खाद्यतेल उद्योगाकडून सोयाबीनला मागणी वाढली असून, आंतरराष्ट्रीय बाजारातील खाद्यतेल दरातील चढ-उतार आणि आयातीवरील परिणामांचाही देशांतर्गत बाजारावर प्रभाव दिसून येत आहे.
जिल्ह्यातील नाफेड खरेदी केंद्रावर सध्या ५,३२८ रुपये हमीभावाने सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे. मात्र, खुल्या बाजारात दर वाढल्याने खरेदी-विक्रीचे गणित बदलले आहे. सध्या शेतकऱ्यांकडे माल कमी असून, व्यापारी आणि साठेबाजांकडे मोठ्या प्रमाणात साठा असल्याने भाववाढीचा प्रत्यक्ष फायदा त्यांनाच अधिक होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस सोयाबीनच्या दरात तेजी कायम राहू शकते. मात्र, भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी शेतकऱ्यांना साठवणूक सुविधा, बाजारभावाची अचूक माहिती आणि धोरणात्मक पाठबळ देणे अत्यावश्यक असल्याचे मत शेतकरी संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.













