ST Workers : महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या आपल्या प्रमुख मागणीसहित वेळेवर कर्मचाऱ्यांना पगार मिळावा तसेच इतर काही तत्सम मागण्यासाठी हा संप त्यावेळी पुकारला होता. हा संप एसटी महामंडळाला देखील मोडीत काढता आला नाही.
शेवटी हे प्रकरण न्यायालयात गेले न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या मागणींवर विचार करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची शिफारस केली. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यास मात्र अनुकूलता दर्शवण्यात आली नाही. वेतनात वाढ झाली म्हणून आंदोलनात सहभागी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली.

पण एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरणचा आपला मुद्दा लावून धरला. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार होती. परिणामी कर्मचाऱ्यांचा संप हळूहळू मोडीत निघाला. आता राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी समर्थन दर्शवणाऱ्या भाजपाचे सरकार आहे. परंतु त्यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. याउलट यामध्ये वाढ झाली आहे. वेळेवर वेतन मिळत नाहीये. वेतनाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे.
परंतु गेल्या महिन्यापर्यंत राज्य शासनाकडून ही जबाबदारी काटेकोरपणे पार पाडली जात नव्हती. पण आता वित्त विभागाच्या माध्यमातून आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची हमी घेण्यात आली आहे. वेतनाचा प्रश्न सुटला असला तरी देखील इतर प्रलंबित मागण्या अजूनही निकाली निघाल्या नाहीत. यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. आझाद मैदानावर आजपासून हे आंदोलन सुरु होणार आहे.
2019 पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकी देणे, एसटी महामंडळात वर्षानुवर्षे काम करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन मिळते त्यामध्ये वाढ करणे, एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना शैक्षणिक पात्रता बघून नोकरीत पाच टक्के आरक्षण द्यावे, एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत प्रवासाचा पास द्यावा यांसारख्या इत्यादी प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.
मागण्या मान्य होई पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. निश्चितच आता हे आंदोलन नेमकं काय स्वरूप घेत यावर शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.