Success Story :- कधी नव्हे एवढे दर टोमॅटोला यावर्षी मिळत असल्यामुळे रस्त्यावर फेकून देण्यात येत असलेले टोमॅटो ने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये लाली आणली आहे. यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी भाव कमी होते त्यावेळी टोमॅटो जिवापाड जपले. त्या शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या कष्टाचे मोल मिळाल्याचे चित्र महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात दिसून येत आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकामध्ये सातत्य ठेवले आहे असे शेतकरी लखपती तर काही शेतकरी कोट्याधीश झाल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतीलच. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी गाळलेल्या घामाचे मोल त्यांना यावर्षी टोमॅटो ने दिले असेच म्हणावे लागेल. याच पद्धतीने आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका शेतकरी दांपत्याने एक एकर टोमॅटो लागवडीतुन तब्बल 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले असून त्यांनी गाळलेल्या घामाचे मोल त्यांना मिळाले आहे.

एक एकर टोमॅटोने दिले 15 लाखांचे उत्पन्न
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, खेड तालुक्यात मांजरेवाडी हे एक गाव असून या ठिकाणी अरविंद मांजरे नावाचे शेतकरी त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात. यावर्षी त्यांनी टोमॅटो पिकातून आपल्याला फायदा होईल या आशेने एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोची लागवड केलेली होती. परंतु जेव्हा टोमॅटोचे उत्पादन सुरू झाले तेव्हा फक्त दोन ते तीन रुपये किलो दराने टोमॅटो विकले जात होते. परंतु त्यांनी पुढील टोमॅटोचे दर काय राहतील याचा कुठलाही विचार न करता टोमॅटोची लागवड केली व त्याची व्यवस्थित व्यवस्थापन करून भरपूर उत्पादन घेण्यावर भर दिला.
सुरुवातीला अत्यंत कमी भाव मिळत होता परंतु कालांतराने टोमॅटोच्या भावात सातत्याने वाढ होत गेली व त्यांना याच टोमॅटोने लखपती बनवले. एकूण दीड लाख रुपये खर्च करून त्यांनी एक एकर मध्ये पंधरा लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवले. जवळजवळ त्यांनी 1500 क्रेट टोमॅटोचे उत्पादन आतापर्यंत घेतले असून या माध्यमातून 15 लाखांचे उत्पन्न त्यांनी मिळवले असून अजून देखील टोमॅटो उत्पादन सुरूच असल्यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा त्यांना आहे.
याबाबत माहिती देताना अरविंद मांजरे यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी टोमॅटोला भाव नसल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते. परंतु तरीसुद्धा टोमॅटोचे जोपासना करून उत्पादन मिळवले व आता चांगला भाव मिळत असल्यामुळे त्यांची टोमॅटोची लागवड सार्थ ठरली. या टोमॅटो शेतीमध्ये त्यांना त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाने मोलाची साथ दिली. टोमॅटोमुळे सर्वसामान्य कुटुंबातील असणारे हे शेतकरी कुटुंब आज लखपती झाले असून याचा नक्कीच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो.