कौतुकास्पद ! नितीन गडकरींच्या भाषणातून प्रेरणा घेत मराठमोळ्या तरुणाने सुरू केला गायीच्या शेणापासून पेंट बनवण्याचा व्यवसाय; लाखोंची होतेय कमाई

Ajay Patil
Published:
success story

Success Story : केंद्रीय रस्त्याने महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या कार्यशैलीमुळे आणि हजरजबाबीमुळे कायमच चर्चेत राहतात. त्यांच्या कार्याचे विरोधक देखील प्रशंसक आहेत. आता हिंगोली जिल्ह्यातून त्यांच्या भाषणातून प्रेरणा घेत एका नवयुवक तरुणाने व्यवसायात उडी घेतली आहे. विशेष बाब म्हणजे या व्यवसायात हा तरुण यशस्वी देखील ठरला आहे. खरं पाहता, हिंदू सनातन धर्मात गाईला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

गायीच्या शेणापासून निर्मित गोवऱ्या होम, हवन यांसारख्या धार्मिक कार्यात उपयोगात आणल्या जातात तसेच चुलीत सरपन म्हणून खेड्यांमध्ये आजही गोवऱ्या वापरल्या जातात. यासोबतच शेणाचा वापर हा सेंद्रिय शेतीसाठी होतो. सोबतच कंपोस्ट खत तसेच इतर सेंद्रिय खत निर्मितीसाठी याचा वापर होतो. मात्र आता गायीच्या शेणाचा वापर चक्क रंग बनवण्यासाठी केला जात आहे.

पर्यावरण पूरक रंगनिर्मिती गायीच्या शेणापासून शक्य आहे. गडकरीजी आपल्या भाषणातून वारंवार इको फ्रेंडली रंग निर्मितीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी गाईच्या शेणापासून रंग निर्मिती करण्याचा व्यवसाय उभारण्याचा सल्ला देत असतात. अशातच हिंगोली जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने गडकरी यांच्या भाषणातून प्रेरणा घेत गाईच्या शेणापासून रंग निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे या व्यवसायात या तरुणाला चांगली कमाई होत असून आता राज्यभर त्याने तयार केलेले इको फ्रेंडली रंग विक्री होत आहेत. यामुळे सध्या तरुण शेतकऱ्याने सुरू केलेला हा व्यवसाय परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

यामुळे या तरुण शेतकऱ्याला नितीन गडकरी नवसाला पावले असंच म्हणावं लागेल. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे वाघजाळी येथील तरुण शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. सचिन तांबिले असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. खरं पाहता सचिन यांचा वडीलोपार्जित पशुपालनाचा व्यवसाय आहे. त्यांचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून दुधाचा व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याकडे जवळपास 50 हून अधिक गाई आहेत. मात्र आतापर्यंत त्यांना दूध विक्रीतूनच केवळ नफा मिळत होता.

परंतु नितीन गडकरी यांच्या भाषणातून सचिन यांना गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली रंग निर्मितीची कल्पना सुचली. या अनुषंगाने त्यांनी गाईच्या शेणापासून रंग निर्मितीचा व्यवसाय थाटात उभारला. त्यांनी तयार केलेला रंग प्राकृतिक पेंट आणि वेदांत पेंट या नावाने संपूर्ण राज्यभर विक्री होत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण 18 जिल्ह्यात त्यांचा रंग सध्या स्थितीला विक्री होत आहे. सचिन यांच्या मते गाईच्या शेणापासून तयार होणारा हा रंग पर्यावरण पूरक तर आहेच शिवाय यामुळे मानवाच्या आरोग्याला देखील हानी पोहोचत नाही.

तसेच हा रंग अँटीबॅक्टरियल, नैसर्गिक थर्मल या गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे बाजारात याला मागणी आहे. सचिन यांनी सुरू केलेला हा व्यवसाय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरत असून यामुळे स्थानिकांना रोजगार लाभत आहे. सचिन यांना आपला व्यवसाय अजून मोठ्या स्तरावर घेऊन जायचं आहे. निश्चितच, राजकारणाच्या भाषणातून आश्वासनाचे मृगजळ आपण कायमच ऐकत असतो मात्र एखाद्या राजकारणाच्या भाषणातून प्रेरित होऊन असा स्वतःचा व्यवसाय करणे, स्वतःच्या पायावर उभे राहणे ही घटना निश्चितच पहिल्यांदाच कानावर येत आहे. शिवाय सचिन यांनी हा व्यवसाय सुरू करून इतरांसाठी देखील मार्गदर्शक असं काम केल आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe