Success Story : स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतं ते महाबळेश्वरसारखं थंडगार प्रदेशाच चित्र. खरं पाहता स्ट्रॉबेरी पिकासाठी थंडगार हवामान अत्यावश्यक आहे. मात्र थंड हवामानात वाढणार हे पीक जालना सारख्या उष्ण प्रदेशातही उत्पादित केले जाऊ शकते हेच दाखवून दिले आहे जालना जिल्ह्यातील एका सुशिक्षित तरुणाने.
विशेष म्हणजे जालना जिल्ह्यातील या तरुणाने गच्चीवर स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग करून चांगल्या चांगल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना बुचकाळ्यात पाडलं आहे. विपरीत हवामानात ते पण गच्चीवर केलेला हा स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग सध्या मराठवाड्यात चर्चेचा विषय ठरला आहे. जालना मधील औद्योगिक वसाहती क्षेत्रात राहणाऱ्या महेशने आपल्या गच्चीवर हा प्रयोग केला आहे.

खरं पाहता महेश गायकवाड जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये वास्तव्यास आहेत. सध्या तो कम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे त्याला वेगवेगळ्या फळ पिकांची लागवड करण्याची आवड आहे. फळबागांविषयी तो समाज माध्यमातून कायमच माहिती घेत असतो. स्ट्रॉबेरीची देखील त्याला समाज माध्यमातून माहिती मिळाली.
या अनुषंगाने त्याने स्ट्रॉबेरीची रोपे आपल्या गच्चीवर उत्पादित करण्यासाठी कंबर कसली. त्यांनी 400 विंटर डॉन स्ट्रॉबेरीच्या जातीची रोपे मागवली. रोपे आपल्या सहाशे स्क्वेअर फुट गच्चीवर लावली. प्लास्टिक पिशव्यांमध्ये रोपांची लागवड करण्यात आली आणि ठिबक सिंचनवचा वापर करून पाण्याचे व्यवस्थापन केलं.
ठिबक सिंचन वापरल्याने रोपांमध्ये ओलावा कायम राहिला यामुळे तापमानावर तोडगा काढण्यात आला. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरी मधील किड नियंत्रणासाठी रासायनिक औषधांचा वापर करण्याऐवजी सेंद्रिय कीटकनाशक वापरले. सेंद्रिय खतांचा वापर केला किडनियंत्रणासाठी निंबोळी पेंड वापरली. तीन आठवड्यात स्ट्रॉबेरीची रोपे फुलोरा अवस्थेत आली.
तेथून पुढील सहा आठवड्यात स्ट्रॉबेरीला फळे लागली. या पद्धतीने मराठवाड्यासारख्या उष्ण हवामानात स्ट्रॉबेरीचा मळा बहरू शकतो हा महेशचा प्रयोग यशस्वी झाला. एका स्ट्रॉबेरी ला आठ ते दहा फळे आले असून स्ट्रॉबेरीच्या या चारशे रोपांच्या जोपासणीसाठी त्याला 21000 चा खर्च आला आहे. अजून फळे लागणार असल्याचा दावा महेश ने केला आहे.
महेशचा हा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चांगलाच गाजत आहे. विशेष म्हणजे महेशचा मित्र किरण याच्याकडे शेती आहे यामुळे तो आता महेशकडून स्ट्रॉबेरीची रोपे घेणार असून यातूनच स्ट्रॉबेरी लागवडचा प्रयोग तो आपल्या शेतात करणार आहे. निश्चितच शेती नसताना गच्चीवर स्ट्रॉबेरीचा मळा फुलवून महेशने इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील एक मार्गदर्शक असं काम केलं आहे.