Success Story : देशात अलीकडे शेती सोबतच पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे पशुपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी लाभप्रद सिद्ध होत आहे. आज आपण अशाच एका तरुण दांपत्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या मेहनतीचे आणि नियोजनाच्या जोरावर पशुपालन व्यवसायातून लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे.
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपूर शहराजवळील खेड या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रत्नाकर पुंडलिक शेंडे आणि त्यांची पत्नी रोहिणी रत्नाकर शेंडे यांनीही किमया साधली आहे. रत्नाकर यांनी चार वर्षांपूर्वी एका म्हशीच्या संगोपनातून या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना या व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागला.
दहावीपर्यंत शिकलेले रत्नाकर हार न मानता मात्र या व्यवसायातील बारकावे समजत घेत लढत राहिले. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती म्हणून शिक्षण घेता आलं नाही आणि शिक्षण नसल्यामुळे नोकरीचा काही विषयचं येत नाही. मात्र तरीही त्यांनी आजच्या घडीला नोकरदाराला लाजवेल असं काम केलं आहे.
रत्नाकर यांनी एका म्हशीपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता 14 म्हशीपर्यंत पोहोचला आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून ते खेडमध्ये एकता नगर मध्ये वास्तव्यास आहेत. हा व्यवसाय ते त्याच ठिकाणी करत असून घराशेजारी पुरेशी जागा नसल्याने बाजूच्या मोकळ्या जागेत म्हशीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
रत्नाकर आजच्या घडीला शंभर ते 125 लिटर दूध 40 ते 50 रुपये प्रति लिटर या दराने विकत आहेत. तसेच शिल्लक दुधाचे पनीर तयार करून 360 रुपये प्रति किलो याप्रमाणे तसेच तूप सहाशे रुपये प्रति किलो याप्रमाणे विकत आहेत.
यातून त्यांना महिन्याकाठी एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. याशिवाय शेणखत विक्रीतूनही त्यांना चांगली कमाई होत आहे. निश्चितच केवळ पशुपालन व्यवसायातून रत्नाकर यांनी साधलेली ही प्रगती वाखाण्याजोगे आहे.