Success Story : शेती ही सर्वस्वी निसर्गावर आधारित आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या अनुसरून आपल्या हवामानात जे पिक येईल तेच पिक घ्यावं लागतं. जसं की काजू आणि आंबा कोकणातच चांगला बहरतो. अलीकडे काजू आणि आंबा राज्यातील इतरही भागात येऊ लागले आहेत. प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून हे शक्य करून दाखवल आहे. एवढेच नाही तर आता शेतकऱ्यांनी महाबळेश्वर मध्ये प्रामुख्याने आढळणारी स्ट्रॉबेरी राज्यातील इतरही भागात फुलवण्याची किमया साधली आहे.
सांगली, सातारा, वर्धा जिल्ह्यात याआधी अशी उदाहरणं पाहायला मिळालेत. एवढेच काय तर रायगड मधील कर्जत मध्ये देखील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून दाखवली आहे. दरम्यान आता सिंधुदुर्गात म्हणजेच तळ कोकणात देखील स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते हे एका प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून जगाला दाखवून दिल आहे.
जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मौजे घारपी व आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही वर्षांपासून स्ट्रॉबेरी शेतीचे चलन पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरी पिकासाठी विपरीत हवामान, शेतजमीन देखील लाल भडक मात्र तरी या परिसरातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी पिकातून चांगली कमाई होत आहे. घारपी गावातील जोश कर्णाई यांनी देखील यंदा स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. जोश मूळचे केरळमधील. कामानिमित्त ते मायानगरी मुंबईत आले. मुंबईत काही काळ वास्तव्य केल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या घारपी गावात शेतजमीन विकत घेतली.
विशेष म्हणजे या शेतीमध्ये ते गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे नवनवीन आणि कौतुकास्पद असे प्रयोग करत आहेत. त्यांच्या या प्रयोगाची भुरळ परिसरातील इतर शेतकऱ्यांना देखील पडली आहे. त्यामुळे त्यांच्या बांधावर कायमच प्रयोगशील शेतकऱ्यांची गर्दी पहावयास मिळते. आता त्यानी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. गेले तीन वर्ष ते स्ट्रॉबेरी चे उत्पन्न घेत आहेत. म्हणजेच आता त्यांच्यासाठी हा प्रयोग नवखा नाही पण तळ कोकणात गेल्या तीन वर्षांपासून शेती फुलवली असल्याने महाराष्ट्रात या प्रयोगाची चर्चा आहे.
त्यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतजमीनीत यंदाही स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. एका दिवसात 25 किलोचा उत्पन्न यातून त्यांना मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 700 रुपये किलोचा दर मिळाला मात्र आता दर घसरले असून 250 रुपये प्रति किलो असा भाव त्यांच्या स्ट्रॉबेरीला मिळत आहे. वास्तविक कोकणातील उष्ण आणि दमट हवामान स्ट्रॉबेरी पिकासाठी मानवेल की नाही याबाबत सुरुवातीला त्यांच्याही मनात शंका होतीच. मात्र प्रायोगिक तत्त्वावर केलेली ही शेती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले असून ते आता दरवर्षी स्ट्रॉबेरीचे पीक घेत आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने भात आंबा काजू केळी यांसारखी पिके घेतली जातात.
पण आता प्रयोगशील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची देखील शेती या ठिकाणी यशस्वी करून दाखवली असल्याने हा प्रयोग कौतुकाचा विषय ठरला आहे. निश्चितच लालचुटक स्ट्रॉबेरीचं पीक हे केवळ महाबळेश्वर मध्ये येत असा समज अनेकांचा होता. मात्र आता हा समज खोडत राज्यातील अनेक जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आता स्ट्रॉबेरीचे पीक महाबळेश्वर व्यतिरिक्त इतरही ठिकाणी येऊ शकतं हे दाखवून दिलं आहे. निश्चितच अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार असून शेतीमध्ये कायमच नवनवीन प्रयोग केले पाहिजेत यासाठी मार्गदर्शक राहणार आहेत.