Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल पहावयास मिळत आहे. सध्या शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा मोठा वापर वाढला आहे. यासोबतच उत्पादन वाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर वाढला आहे. यांत्रिकीकरणाच्या वापराने निश्चितच मजूरटंचाईवर शेतकऱ्यांना मात करता आली आहे मात्र रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर चिंतेचा विषय बनत आहे.
रासायनिक खतांचा संतुलित प्रमाणापेक्षा अधिकच्या वापराने शेत जमिनीचा पोत ढासळला आहे. यामुळे पीक उत्पादकता कमी झाली आहे. शिवाय, जमीन नापीक बनण्याचा धोका तसेच मृदा प्रदूषण आणि जल प्रदूषण देखील यामुळे मोठ्या प्रमाणात होत आहे. एवढेच नाही तर रासायनिक खतांच्या अधिकच्या वापरामुळे उत्पादित झालेला शेतमाल मानवाच्या आरोग्याला घातक ठरत आहे. परिणामी आता तज्ञ लोक सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देत आहेत.
शासनाकडून यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू झाल्या आहेत. शिवाय काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचे दुष्परिणाम ओळखून आता सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. असाच एक सेंद्रिय शेतीचा भन्नाट प्रयोग वाशीम जिल्ह्यातून समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रयोगाच्या माध्यमातून या संबंधित शेतकऱ्याने लाखो रुपयांची कमाई केली आहे. यामुळे सेंद्रिय शेती आतबट्ट्याचा व्यवहार असल्याची धारणा मोडीत काढण्यात आली आहे.
वासिमच्या तामसी शिवारात वसलेल्या राधेश्याम मंत्री या प्रयोगशील शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतीने खरबूज उत्पादित करून लाखोंची कमाई केली आहे. मंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे, ते गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत. परंतु पारंपारिक पिकपपद्धतीमध्ये त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं. यामुळे फळबाग लागवड करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि आपल्या दोन एकरात त्यांनी एप्पल बोर ची लागवड केली. मात्र यापासून उत्पादन मिळण्यास उशीर असल्याने त्यांनी यामध्ये आंतरपीक शेती करण्याचा निर्णय घेतला.
या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात या एप्पल बोरच्या बागेत सोयाबीनची पेरणी केली. सोयाबीन काढणी झाल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी खरबूज लागवड केली. खरबूज लागवड पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करण्यात आली, रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर झाला. यामुळे खरबूजचे पीक चांगले जोमदार बहरले आणि अवघ्या 82 व्या दिवशी यापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. त्यांनी स्थानिक बाजारात खरबूज विक्री करणे ऐवजी थेट कश्मीरच्या बाजारपेठेत खरबूज विक्री केली.
व्यापाऱ्याच्या माध्यमातून ही विक्री होत असून त्यांना जागेवरच 17 रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे. आतापर्यंत 20 टन इतके खरबुजाचे उत्पादन त्यांना मिळाले असून आणखी 18 टन उत्पादन त्यांना यातून मिळेल अशी आशा आहे. जर असाच बाजार भाव आगामी काही दिवस कायम राहिला तर त्यांना यातून सहा ते साडेसहा लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे सेंद्रिय पद्धतीने खरबूजची लागवड झाली असल्याने त्यांना मात्र 50 हजाराचा उत्पादन खर्च या ठिकाणी लागला आहे.
निश्चितच खर्च वजा करता त्यांना जवळपास सहा लाखांची कमाई मात्र दोन एकरात ती ही 82 दिवसात होणार आहे. त्यामुळे सध्या या प्रयोगाची चर्चा रंगली असून मंत्री तुम्ही नादच केलाय थेट अस आता परिसरातील शेतकरी म्हणू लागले आहेत. एकंदरीत मंत्री यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे आणि इतर शेतकऱ्यांनी देखील या पद्धतीने सेंद्रिय शेतीमध्ये आपलं नशीब आजमावलं तर जमिनीचा पोत अबाधित राहील आणि अधिकचे उत्पादन त्यांना मिळणार आहे.