Success Story : मराठवाडा म्हटलं की समोर उभे राहतं ते शेतकरी आत्महत्येचे हृदय विदारक दृश्य. निश्चितच मराठवाडा आणि विदर्भात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात सह संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र अलीकडील काही वर्षात येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायातून लाखो रुपये कमवून दाखवले आहेत. विशेष म्हणजे या विभागातील शेतकऱ्यांनी राबवलेले प्रयोग राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातही असाच एक कौतुकास्पद प्रयोग समोर येत असून या प्रयोगाने सध्या अख्या महाराष्ट्राला भुरळ पाडली आहे. जिल्ह्यातील परतुर तालुक्याच्या मौजे वाटूर येथील उच्चशिक्षित शेतकरी बंधूंनी शेती व्यवसायाला जोड व्यवसायाची जोड देत आर्थिक उन्नती साधली आहे. गजानन नरहरी माने आणि राजेश नरहरी माने या दोन्ही भावांनी उच्च शिक्षण घेतलेले असतानाही नोकरी ऐवजी शेती मध्ये आपले करिअर घडवले आहे.
या दोघांनी रोपनिर्मितीच्या व्यवसायात चांगली कामगिरी केली असून त्यांनी तयार केलेली रोपे मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 10 जिल्ह्यात पोहचली आहेत. यामुळे या व्यवसायातून फक्त त्यांनाच फायदा होत आहे असं नाही तर दर्जेदार रोपांची शेतकऱ्यांना उपलब्धता होत असल्याने इतर शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होत आहे. गजानन यांनी बीएससी ऍग्रीचे शिक्षण घेतल आहे तर राजेशने डीटीएड पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. पण उच्च शिक्षणानंतर ही त्यांनी नोकरीचा मोह टाळला. अगदी कोवळ्या वयातच शेतीशी नाळ जोडलेली असल्याने त्यांनी शेतीमध्येच आपलं भविष्य घडवण्याचा निर्णय घेतला.
या पार्श्वभूमीवर त्यांनी आठ वर्षांपूर्वी रोपवाटिका व्यवसायाला सुरुवात केली. 20 गुंठ्यात त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. माने बंधूनी आपल्या शिक्षणाचा वापर व्यवसायात केला. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मात्र 40 दिवसात उच्च प्रतीची भाजीपाला रोपे ते तयार करत आहेत. यामुळे त्यांना या व्यवसायात यश संपादन करता आले आहे. माने बंधू भाजीपाला रोपांची निर्मिती करण्यावर भर देत आहेत. दिवसाकाठी सध्या माने बंधू दहा ते पंधरा हजार रुपयांची रोपे तयार करून विक्री करत आहेत. सुरुवातीला अर्धा एकरात रोपवाटिका सुरू केली होती मात्र आता दोन एकरात ही वाटिका विस्तारली आहे.
विशेष म्हणजे भाजीपाला समवेत फळ पिकांची देखील रोपे ते तयार करत आहेत. टोमॅटो, मिरची, कोबी, वांगे, सिमला मिरची, टरबूज, खरबूज, सीताफळ, जांभळ, शेवगा इत्यादी रोपांची निर्मिती त्यांच्या रोपवाटिकेत होत असून तयार केलेली रोपे दर्जेदार असल्याने मोठी मागणी पंचक्रोशीत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून या रोपांची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. निश्चितच एकीकडे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे वाढलेले प्रमाण चिंतेचा विषय आहे तर दुसरीकडे माने बंधू सारख्या उच्चशिक्षित तरुणांनी शेतीमध्ये साधलेली ही प्रगती इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी सिद्ध होत आहे.